वानोळा
*"वानोळा"* *तू सासरी निघाली आहेस तर जातांना "वानोळा" घेऊन जा.. रिकाम्या हाताने जाऊ नये, तुझे घरचे लोकं काय म्हणतील?"* *वरिल वाक्य कानावर पडले, आणि "वानोळा" शब्द मनात फिरत राहिला, आणि नकळत मन बालपणात गेलं..* *तेव्हा असली चॉकोलेट, कॅडबरी नाही मिळायची हातावर, किंवा अशी घसघशीत किमतीची चकचकीत मिठाईची पाकिटं देखील नाही मिळायची पाहुण्यांना निघताना..* *तेव्हा पाहुण्यांना निरोप मिळायचा, तो भुईमूगाच्या शेंगा, मक्याची कणसे, घरी बनवलेल्या पायली दोन पायली डाळी, ओल्या हरभऱ्याची पेंढी, शेतात पिकलेली ताजी हिरवीगार मेथी- कोथंबीरची जुडी..* *आणि असलंच बागायतदार घर, तर टोपलीभर पेरू, पपई सारखी फळं, आणि अजून श्रीमंत घरात गेलं की, मिळायचा केळीचा घड, तोही पूर्ण किमान दहा डझनभर केळी लपेटलेला....* *मग घरी येऊन जोवर तो "वानोळा" पुरायचा, तोवर त्या नातलगांची आठवण रोज निघायची.. तो "वानोळा" केवळ जिन्नस नसायचा, ती माया असायची.. प्रेम असायचं, हृदयातून पोटापर्यंत जाणारं...* *वाळवणाचे दिवस असले की, मग तर बघणंच नको. पापड, कुरडई प्रत्येक घरात व्हायची. तरी शेजार पाजारी...