अंतःकरण
🌱🎋🌱
"मुलगा चांगलाय."
बाई अगदी खात्रीनं बोलल्या. त्यांच्या थोरल्या मुलीसाठी स्थळ आलं होतं. त्याविषयी काय सांगू नि काय नको, असं त्यांना झालं होतं.
मुलाची नोकरी, पगार, घर वगैरे सचित्र सांगून झाल्यावर बाई सांगू लागल्या, "एक म्हणून व्यसन नाही. सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही. दारू पित नाही. सिगारेट ओढत नाही. कसला नाद करत नाही. कसली सवय नाही."
हा महामिस्किल. तो म्हणाला, "अहो, मग करतो काय हा गोट्या?"
बाई म्हणाल्या, "करतो काय म्हणजे, मोठ्या कंपनीत इंजिनिअरचा जॉब करतो."
"अहो, पण त्याला काही नाद आहे की नाही? काही सवय आहे की नाही? कोणत्या सवयी नाहीत, हे कळलं, पण सवयी मग आहेत कोणत्या? करतो काय म्हणजे!"
आपलं जरा चांगलं झालं की लोक असे आडव्यात बोलणारे असतात, हे बाईंना माहीत होतं. याला त्यापैकी एक मानून त्यांनी याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं.
काय करत नाही, यावरच आपल्याकडं चारित्र्य ठरतं. "हे करू नकोस, ते करू नकोस". अरे, पण करायचं काय, हे मुलांना कोणी सांगतच नाही. पालकांना तरी ते कुठं माहीत असतं!
दारू पिऊन मिळणारा आनंद खरा नाही, हे सांगायला हवंच, पण मग आनंदाचे झरे शोधायचे कसे, हेही तर कळायला हवं. सिगारेटच्या धुम्रवलयात अथवा दारूच्या प्याल्यात निराशा बुडवून नसते टाकायची, हे सांगायला हवंच, पण मग या निराशेच्या गावाचं रुपांतर चेतना चिंतामणीच्या गावात कसं करायचं, हेही तर समजायला हवं. तुम्ही ना त्यांच्याशी बोलणार, ना त्यांना आनंदाच्या या वाटा दाखवणार. मग मुलं आपापल्या वाटा शोधत जातात, तेव्हा त्याला लेबल चिकटवणार!
इंदिरा संत आणि नारायण संत या कवी दांपत्याचा संसार अल्पायुषीच. कारण, खूप लवकर नारायण निवर्तले. पण, जो संसार होता, तो होता बहराचाच. एक प्रसंग इंदिराबाईंनी सांगितलाय.
बेळगावातली गोष्ट. रात्रीची वेळ. बाई स्वयंपाक करत होत्या. अचानक नारायण संत आले. "इंदिरा, चल लवकर. बाहेर घोडागाडी थांबवलीय." बाईंचा स्वयंपाक सुरू. साडी पिठानं माखलेली. तासाभरानं जाऊ, म्हणून बाईंनी सांगितलं. पण, कविवर्य हट्ट करून बसलेले. ते बाईंना तसेच- स्वयंपाक अर्ध्यावर टाकून- घेऊन गेले. घेऊन गेले असेच दूर. शहराच्या बाहेर. तिथं काळाकभिन्न अंधार. तिथल्या एका जुन्या पुलावर त्यांनी गाडी थांबवली. बाईंना उतरवलं. म्हणाले, "समोर बघ!" आणि, बाईंचे डोळे दिपून गेले. त्या घनघोर अंधारावर हजारो काजवे चाल करत होते. प्रकाशाचा अनोखा उत्सव तिथे सुरू होता. नारायण म्हणाले, "मघाशी येताना मी हे पाहिलं आणि म्हटलं तुलाही दाखवायला पाहिजे!"
त्यानंतर दोघेही निःशब्द. अंधार- उजेडाची लढाई अनुभवण्यात मग्न. त्या प्रकाशात चिंब. कधीतरी भानावर आले आणि घरी परतले.
असा आनंद ज्यांच्या गावीच नाही, त्यांच्या गावात मग वाचनालयं नसतील, पण बार नावाचे गुत्ते असतील. त्यांच्या गावात कलासक्त जागा नसतील, पण टप-या असतील. आनंदाच्या या वाटा ज्यानं त्यानं शोधायच्या हे खोटं नाही, पण त्या वाटाही बोट धरून दाखवाव्या लागतात. 'भाग मिल्खा भाग'च्या लयीत मिल्खा धावतो आणि बादलीभर घाम गाळतो, तेव्हा त्याला मिळणा-या आनंदाची ती वाट दाखवायला हवी. एखादी कविता कोणत्या वाटेनं घेऊन जाऊ शकते, ती वाट चालता यायला हवी. कुमार गंधर्व अथवा किशोरीबाई किती वेड लावतात, त्या वेडाची जातकुळी कळायला हवी. चंद्र- चांदण्यांनी अशी साद घालायला हवी. शेतातला आंब्याचा पिवळाधम्मक मोहोर बघताना नाकांनीही दाद द्यायला हवी. देहभान विसरून नाचताना ब्रह्मानंदी टाळी लागायला हवी.
ज्याला आनंदाचे झरे सापडतील असे, तो त्या रिकाम्या मधुघटात मधू कशाला शोधत बसेल? हे बोटच आपण सोडून देतो आणि मग निराधार, असहाय्य झालेला माणूस नशा करू लागतो. तुम्हाला वाटतात, त्या नशा एकवेळ परवडल्या. त्याहून भयंकर असलेल्या देवा-धर्माच्या- विखारी राष्ट्रवादाच्या नशेत तो बुडून जातो. एक व्यक्ती म्हणून नाही, समाज म्हणूनही. अशाच निराधार समाजाला 'मीडिया' गाठतो. मग एखाद्या ॲनस्थेशियासारखा हा मीडिया भूल देऊ लागतो. ज्याच्या व्यक्तिगत आणि सामूहिक आयुष्यात काहीच घडत नाही, त्याला 'हॅपनिंग'साठी सतत असं काहीतरी हवं असतं. मग मारामा-या आवडतात. हिंसाचार आवडतात. भयंकर रडारड आवडते. मेलोड्रामा आवडतो. व्यक्ती असो की समाज, आनंदापासून दूर गेलेल्यांची स्थिती अशीच होते.
त्याला आठवलं, मुलगा सतत 'क्राइम पेट्रोल' बघतो, म्हणून एका आईनं त्याच्याकडं मुलाची तक्रार केली होती. आई आपल्या नेहमीच्या मराठी मालिका बघणारी. पण, त्या मालिका एकदाच बघूनही याच्या लक्षात आलं की, आईच्या त्या मालिकांपेक्षा 'क्राइम पेट्रोल' अगदीच निर्धोक आणि सुरक्षित आहे. ही अवस्था मालिकांची. वृत्तवाहिन्यांविषयी तर बोलणंही कठीण. एखाद्या भयंकर ड्रगची नशाही सामान्य भासावी, असं हे प्रकरण.
पण, हे होणारच. कारण, रोजचं जगणं भयंकर आहे आणि आपल्याला त्यापासून दूर पळायचं आहे. मात्र, आनंदाची वाट काही केल्या सापडत नाही. ती चोखाळायला कधी कोणी शिकवलं नाही. 'याचा काय फायदा?' हेच जिथं शिकवलं जातं, तिथं आनंदाच्या अशा वाटा कोण शिकवेल? जे कलासक्त क्षेत्रात करिअर करू पाहातात, तेही नंतर फक्त करिअरच करतात नि कलेतला आनंद मात्र गमावून बसतात! आठ-नऊ वर्षांची चिमुकली पोर बापाच्या वाढदिवशी खास स्वतःहून ग्रिटिंग कार्ड तयार करून देते, तेव्हा ते करताना तिला आणि मिळाल्यावर बापाला जो आनंद होतो, त्याची सर कशाला असू शकते? दूर कशाला, आमच्या कोल्हापुरी मित्रांना 'तांबडा-पांढरा'ची वाटी तोंडाला लागल्यावर आणखी कशाची आठवण येऊ शकते?
अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर बराक ओबामांना कोणीतरी विचारलं - "तुम्ही असे कलावंत. कलासक्त. लेखक. वक्ते. विचारवंत. तरीही तुम्ही अमेरिकेचे अध्यक्ष कसे झालात?" तेव्हा आपल्या खास मिस्कील शैलीत स्मित करत बराक म्हणाले, "म्हणूनच तर झालो!" अमेरिकेच्या अध्यक्षाला शेवटी करायचं काय असतं? अमेरिकेची राज्यघटनाच तर 'परस्यूट ऑफ हॅपिनेस'वर उभी आहे. प्रत्येकाला आनंदानं जगण्याचा हक्क आहे, ही गोष्ट राज्यघटनेनेच सांगावी, हे किती महत्त्वाचे! तेवढेच, जेवढे महत्त्वाचे आहे - 'जो जे वांछिल, तो ते लाहो' अशी अपेक्षा व्यक्त करणारे ज्ञानदेवांचे पसायदान.
सॉमरसेट मॉमच्या शब्दांत पैसा हे सहावं इंद्रिय आहे. आणि, ते आहेच. म्हणून तर अमेरिका आपल्या नागरिकांना आनंदाची अशी ग्वाही देऊ शकतं. पण, त्याचवेळी 'ग्रॉस हॅपिनेस इंडेक्स'च्या निकषावर भूतान अमेरिकेलाही मागं टाकत असतं. कारण शेवटी पैसा तुम्हाला आनंद देत नाही. पैसे पर्याय देतं. आनंदी होणं अथवा न होणं हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असतं.
बिल गेट्स प्रचंड पैसेवाले आहेत, हे तुम्हाला जग सांगेल, पण बिल गेट्स ब्रिज वा टेनिस खेळताना देहभान विसरतात, हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. रंगबिरंगी दुनिया उभी करणारा हा उद्योजक स्वतः रंगांधळा आहे, हेही तुम्हाला कोणी सांगणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शेकडो विशेषणे न थकता लावणारे लोक बाबासाहेबांनी व्हायोलिन वाजवण्यासाठी आणि बागकाम करण्यासाठी तळेगावात टुमदार बंगला घेतला होता, हे कदाचित सांगणार नाहीत. बाबासाहेबांना मोजके पण जिव्हाळ्याचे मित्र होते. 'मिस एफ'सारखी एक निखळ मैत्रीण होती, हे तर तुम्हाला सांगितलंही जाणार नाही. सगळ्या 'सक्सेस स्टोरी' आपण अशा थाटात सांगतो की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात तलवार देऊन टाकायची, गांधींच्या हातात एक काठी द्यायची. बास्स! अरे, हेही सगळे लोक मानवी देह होते. आपल्यासारखेच जेवत वगैरे होते. सामान्य विधी करत होते. चालतीबोलती माणसं होती ती. त्यांच्या या यशकथेच्या पलिकडं त्यांना खोदलं की मग त्यांचे हे झरे सापडू लागतात. हे झरे होते, म्हणून ही माणसं आटली नाहीत. गोठली नाहीत. आपल्यातही असतात असे झरे. हे झरे शोधत राहाणं महत्त्वाचं.
आनंदावर तर अमेरिका नावाचं वैभव उभं राहिलं. आपण मात्र वैभव आणि आनंद, पैसा आणि आनंद यांची पार फारकत करून टाकली. तुम्हाला मुंबईतलं 'जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स' माहीत आहे? त्याची स्थापना १८५७ ची. सर जमशेटजी हे या संस्थेचे संस्थापक. या स्कूलचं मूळ नाव होतं - जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स ॲंड इंडस्ट्रिज. स्थापनेनंतर दोन वर्षांत जमशेट शेठ वारले. लोकांना वाटलं, हे नाव चुकून पडलं असेल. आर्ट्स आणि इंडस्ट्रिज हे एकत्र कसं असेल? मग त्यातनं इंडस्ट्रिज वगळलं गेलं. हे द्वैत हीच आपली मोठी धोरणात्मक कोंडी आहे.
भारतावर राज्य करणारे इंग्रज अख्ख्या भारताचे भूमापन करण्यासाठी प्रसंगी हौतात्म्य पत्करत होते. त्याचवेळी व्हीटी स्टेशनसारख्या सुंदर सुंदर इमारती बांधत होते. आणि, अजिंठ्यासारख्या गुहांचा शोध घेत होते. दृश्य कलांचं आकलन ब्रिटिशांना होतं, तसं भारतीय चित्रकारांपर्यंत कधी पोहोचलं नाही. यात इंग्लंड- अमेरिका थोर वगैरे मुद्दा नाही. त्यांचे त्यांचे प्रॉब्लेम्स काही कमी नाहीत! मुद्दा आहे तो, आपण कला नावाची गोष्ट एका कोप-यात टाकून दिली. पुस्तकांचं गाव करतो आपण, पण गावात पुस्तकं नसतात, त्याचं काय!
जगणं हीच मुळात केवढी सुंदर गोष्ट आहे, हे विसरून स्वतःला आपण शर्यतीतले घोडे केले, की मग तुमच्यावर कोणीतरी मांड ठोकणारच.
आपण माणसं आहोत, यार.
अनेकविध अनुभवांनी झंकारणा-या तारा अंतःकरणात असणं, हे माणूस असण्याचं खरं लक्षण. बाहेरच्या सा-या तारांनी आणि जाळ्यांनी आपण जग कवेत घेत आहोत हे खरे, पण त्या खटाटोपात आपल्या अंतःकरणात झंकारणा-या ताराच आपण विसरून गेलो तर? जगण्याच्या कक्षा विस्तारत असताना आपण आनंदाच्या शक्यता मात्र कमी कमी करत चाललो आहोत. घटनांची गुंतागुंत वाढू लागलेली असताना अन्वयाच्या शक्यता किमान करत चाललो आहोत. सगळे पर्याय खोडत अशा जागी येऊन स्थिरावलो आहोत, की 'जगावं की मरावं' असा सवाल उपस्थित व्हावा.
वेळ अद्यापही गेलेली नाही, प्रिय.
पुन्हा माणूस होणं, एवढंही अवघड नाही!
- स्वामी संजयानंद
#मॉर्निंग_वॉक_साक्षात्कार
(संदर्भः 'कला कल्पतरूंचे आरव - आनंदाचे झरे जपायचे कसे?' हे संजय आवटे यांचे पुस्तक)
🌱🎋🌱
Comments
Post a Comment