वीस रूपयाची नोट

*वीस रूपयाची नोट........*

आज मैत्रिणीबरोबर माॅलमधे शॉपिंग   आणि त्यानंतर बर्गर /पिझ्झाचं डिनर करून संध्याकाळ मस्त घालवयाची असा बेत बनवला.माझी मैत्रीण,  लीना ठरल्याप्रमाणे चार वाजता घरासमोर मला पिकअप करायला पोहचली. घराला कुलूप लावून मी तिच्या कारमध्ये जाऊन बसले. गाडी मॉलच्या रस्त्यावर धावू लागली.
माझी नजर तिच्या रियर व्ह्यू आरश्याला लटकवलेल्या कार हँगिंगवर पडली. काहीतरी एकदम वेगळं. 20 रुपयाची लॅमिनेट केलेली एक नोट!
मी  लीनाला उत्सुकतेने विचारलं !" 20ची नोट? काय गं हे?  पहिली कमाई, लकी चार्म, का कुणी स्पेशल व्यक्तीने दिलेली आठवण?"
तिने हसून सांगितलं!"अहं,!यापैकी काहीच नाही.  हे आहे "रिमाइंडर"!!

" रिमाइंडर? कसले रिमाइंडर"? 

ती म्हणाली "यामागे छोटासा किस्सा आहे. ऐकशील?"
 मी सीटमध्ये थोडीशी वाकडी होऊन बसले आणि उत्सुकतेने तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हटलं "हो नक्कीच! काहीतरी गंमतशीर वाटतंय"
 ती म्हणाली ,"हो गंमतशीरही आणि माझ्या चेहऱ्यावर एक चपराकही."

लीना सांगू लागली," मी नुकतीच एका एक्झिबिशनमधे शॉपिंग करायला गेली. कोविडनंतर भरलेलं हे इथलं पहिलंच एक्झिबिशन होतं. मी एका सिरामिक पॉटच्या स्टॉलवर गेली. पाहिलाच दिवस असल्यामुळे स्टॉल अजून पूर्णपणे लागलेला नव्हता. एका बाजूला क्रॅक गेलेले किंवा  छोटासा टवका उडालेले थोडे "डॅमेज्ड" पाॅट्स ठेवलेले होते, तर दुसऱ्या बाजूला व्यवस्थित असलेलं सामान विक्रीसाठी रचून ठेवलं होतं.
दुकानावर वीस-बावीस वर्षांची दोन मुले होती. मी त्यांना विचारलं हा काय प्रकार आहे म्हणून? त्यांनी त्यांच्या भाषेत माहिती पुरवली की  लाॅकडाऊनमुळे अनेक दिवस त्यांचा माल एका ठिकाणी अडकून पडला होता. नंतर जेव्हा त्यांनी तो उचलला तेव्हा  सामानाचं बरंच नुकसान झालेलं होतं. त्यांचे वडील स्वतः पॉटरी आर्टिस्ट होते पण covid-19 मुळे ते मरण पावले. ते दोघंही शिकत होते, पण वडील गेल्यानंतर जेंव्हा रोजीरोटीचा प्रश्न पडला तेंव्हा दोघांनी हेच काम पुढे न्यायचं ठरवलं.
  सगळया वस्तूंवर प्राईस टॅग लागलेले होते.  किंमती अगदी वाजवी होत्या. मी माझ्या गरजेनुसार चार पॉटस घेतले आणि  नर्सरीतून आणलेल्या दोन जेडच्या झाडांसाठी दोन छान सारख्या कुंड्या शोधायला लागली.एक कुंडी खूप आवडली. मी त्यांना त्यासारखी दूसरी शोधायला सांगितली पण अगदी सारखी कुंडी  मिळेना. "डॅमेज्ड" सामानाच्या ढिगातून त्याला तशीच एक कुंडी मिळाली. त्याचा अगदी छोटासा एक टवका उडाला होता.  तेवढा भाग मागे करून डॅमेज लपवता येणं सहज शक्य होतं म्हणून मी ती विकत घ्यायचं ठरवलं. त्याने "डॅमेज्ड"माल म्हणून आपणहून त्याची  किंमत अर्धी केली. मी मनातल्या मनात फार खुश, मात्र त्यामुळे माझ्याआतला बार्गैनचा कीडा वळवळला.

मी सगळं मिळून किती पैसे झाले विचारलं. सगळ्या सामानाचे 650 होतील याचा मला अंदाज आलेला आणि मी 550च  देईन हे स्वतःशी ठरवून टाकलं.
त्या तरुणाने बेरीज करून, डिस्काउंट करून 520 रुपये सांगितल्यावर खरं तर मुकाट्याने आणि आनंदाने मी त्याला 520 नको का द्यायला  हवे होते पण कां माहित नाही मला त्याच्याशी घासाघीस करायचा जोर आला.
अजिबात कारण नसतांना,मी त्याला म्हणाली,"नही भैया  500 ठीक है."
तो फार विनवणीने म्हणाला, मॅडम हमारा धंधा वैसेही बहुत मंदा चल रहा है, हमारे माल का कितना नुकसान हुआ है आप तो देख ही रही हैं ! ₹ 20 से आपका क्या बिगड़ जाएगा ?"
मी तावातावात म्हटलं,"वीस रुपये  पेड पर लगते है क्या? ऐसा करो 20 रुपये कम नहीं कर सकते तो उसकी जगह एक कोई और सामान दे दो।"
त्याने  बराच वेळ मला मनवायचा प्रयत्न केला पण मी अगदी उगाच अडून बसली होती. शेवटी त्यातला शांत बसलेला दूसरा मुलगा मिश्किलपणे पहिल्याला हळूच म्हणाला,मॅडम को वो "कटोरा" दे दो फ्री में, उनके लिये सही है.
 "कटोरा" शब्द ज्या टोनमधे त्याने उच्चारला, तो टोन मला खूप बोचला. मी त्यांना म्हणलं ,"आपका मजाक मेरी समझ में आ गया" आणि तावातावाने  520 रुपये देवून मी त्याचा कडून ते पॅक केलेलं सगळं सामान घेवून कारमधे  बसली.माझ्या मनासारखं होऊनदेखील आतून आनंद नव्हता उलट "कटोरा" शब्द वापरला याचा राग होता. दोन मिनिटं कारमध्ये तशीच बसून राहिली, काय करावं सुचेना. मग ठरवलं की नकोच हा कटोरा, समजतात काय हे स्वतःला?
हे परत करते आणि माझे 20 रुपये परत घेते असा दुष्ट विचार मनात येताच, 
सामानातून ते छोटं भांड काढलं न्  बघते तर काय , मला त्यात 20 रुपयाची ही नोट दिसली.
 मी हैराण! स्वतःची लाज वाटली. एसी कारमधून फिरणारी,महिन्याला 6आकडी लठ्ठ पगार घेणारी, कोविडमुळे कुठे ही आर्थिक संकट न झेलणारी, मी या 20 रुपयासाठी इतकी बार्गैनिंग का करत होती?
दुसऱ्यांच्या लाचारीमधे स्वस्त खरेदीची दडलेली संधी शोधणारी मी स्वतःला सुशिक्षित/सुसंस्कृत का म्हणवून घेते ?
 ठरवलं!  हे  पैसे आपल्याजवळ न ठेवता एका भिकाऱ्याला द्यायचे, पण दुसऱ्याच क्षणी विचार आला की भीक मागणार्‍याला मी फुकट पैसे द्यायचे आणि मेहनत करणाऱ्याला त्याचा मेहनतीचा पैसा  देतांना ॲटिट्युड दाखवायचा?"

"अंजली! कधीकधी आपण उगाच विचित्र वागतो,अगदी कारण नसतांना आणि विचित्र वागतोय हे कळत असलं तरीही थांबत नाही. मग या  यूजलेस ईगोपायी मामला लांबत जातो.
गरीब भाजीवाल्यांशी,रोडसाईड वेंडर्सशी भाव करतो आणि माॅलमधे जाऊन निरर्थक वस्तू विकत घेऊन येतो, का तर म्हणे ब्रँडेड!!
खरं पाहिलं तर लक्षात येईल की आपण गिऱ्हाईक म्हणून न केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावू शकतो, आपले सामाजिक ऋण देखील फेडू शकतो!"
मी मधेच विचारलं,"ते कसं?"
"अगं!काय घेतोय आणि कुणाकडून घेतोय हे विचारपूर्वक ठरवायचं बस!!
राष्ट्रप्रेमापायी दरवेळेस सगळ्यांना बॉर्डरवर लढणे शक्य नाही किंवा फक्त रुल अबायडिंग सिटिझन होणेच पुरेसं नाही, शॉपिंगसारख्या छोट्या गोष्टीतून देखील मी माझ्या देशवासीयांवर प्रेम करू शकते , सह-संवेदनशील राहू शकते याचा साक्षात्कार मला "कटोर्‍यातील" ह्या वीस रुपयांनी करवून दिला. मी किंवा माझ्या घरचे, जे कुणी ही गाडी घेवून जातात, ही लटकती नोट  त्यांना रिमाईंडर देते. कोणत्या वस्तू घरी आणाव्यात आणि कुणाकडून विकत घ्यावात या दोन सोप्या फॉर्म्युल्याने आम्ही लोक आपल्यापरीने सामाजिक दायित्व निभावतो आहे."

लीनाची गोष्ट ऐकून मी थक्क झाले!  साध्या आणि दैनंदिन जीवनातल्या कृतीतून देशप्रेमाची ही संकल्पना मला मनापासून पटली. मी मनातल्या मनात मी वापरत असलेल्या ब्रँडेड आणि विदेशी वस्तूंचे  देशी विकल्प काय , याचा विचार करु लागले.

 स्टिअरिंग व्हीलवर असलेल्या लीनाच्या हातावर हात ठेवून तिला म्हणलं ," ए, कार वळव,आपण क्राफ्टबाझारला जाऊ आणि मग छान सिजनल सरसों का साग-मक्के दी रोटीवर ताव मारून परत येवू आणि हो तुझा तो "कटोरा" मला दे, मला रिमांईडर म्हणून. क्या बोलती?"
तिने जोरात होकारार्थी मान हलवली आणि
आम्ही दोघी समाधानी आनंदाने हसलो.

(सत्य घटनेवर आधारित)

डॉक्टर आरती केळकर
9822240229

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

निवृत्ती वेतनाचे प्रकार

पुण्यातील पेठांची यादी व माहिती (इतिहास)