शाळेतील माझा आवडता विषय : एकही नाही...
शाळेतील माझा आवडता विषय : एकही नाही...
मराठी मधील व्याकरण त्यावेळेसही जमलं नाही, आताही जमत नाही.
*कर्तरी* हे पौराणिक नाव वाटते तर *कर्मणी* हा जर्मनीचा शेजारी वाटतो.
*'वृत्त'* त्याच्याकडे दुर्लक्ष करायला प्रवृत्त करतं.
*हिंदी* बोलायला लागलो की लोकं म्हणतात...... हिंदी तेरे बस की नही, तू मराठी बोल, हम समझ लेंगे |
*इंग्रजीचा* आणि माझा ३६ चा आकडा. त्यावेळीही होता, आताही आहे आणि उद्याही राहील असे वाटते आहे. कारण आपले पूर्वज ज्यांच्या विरुद्ध लढले त्यांची भाषा आपण शिकणे ही आपल्या पूर्वजांशी प्रतारणा करणे आहे असा माझा दृढ समज आहे.
*इतिहासात* आम्ही कधी रमलोच नाही. कारण कोण कोणास काय म्हणाले हे ऐकायला मी तिथे थोडाच होतो? इतकेच काय पण आता असलेल्यांनापैकीही कुणी त्यावेळी असणे मला शक्य वाटत नाही. मग त्यावेळी ते काय म्हणाले हे आपण ठामपणे कसे सांगू शकतो? आणि अकबराचा जन्म कधीही झाला असला तरी त्याने आज काय फरक पडणार आहे?
*भूगोल* मधील टुंड्रा प्रदेशात मी या जन्मात तरी जाणार नाही. आपल्याला तेथील थंडी मानवणारच नाही. मग जिथे जायचे नाही त्याची वाट तरी का माहिती करून घ्यायची? मोठे लोक सांगून गेलेत, 'ज्या गावी जायचे नाही, त्याचा रस्ता विचारू नये.' आणि मी मोठ्यांचा पूर्ण मान राखत होतो. अजूनही राखतो.
*नागरिक शास्त्र* बद्दल काय बोलू? खासदार आणि आमदार हे एखाद्या किल्ल्याचे दरवाजे वाटत होते. ज्यातून सामान्य जनता येजा करते ते 'आमदार' आणि ज्यातून खास लोक ये जा करतात ते 'खासदार'. आणि आजची बात करायची तर आता सगळेच 'जमादार' ( म्हणजे माया जमा करणारे हो ) झाले आहेत.
*भूमितीत* मी गोल अंडाकृती आणि चौकोन आयताकृती काढायचो.
बाकी *कोबाको, बाकोबा, कोकोबा* या सगळ्या बोकोबाच्या प्रजाती वाटत.
*गणित* मध्ये मला फक्त बेरीज आणि वजाबाकी तेवढी जमली. त्याचे राजकारण चांगले जमत होते पण त्यावेळी कुणी याचा फायदाच करून घेतला नाही; आणि आजची गणितं कधी बदलतील हे न्यूजच्यानलवालेही सांगू शकत नाहीत.
*सायन्स* मध्ये जीवशास्त्राने माझा जीव घेतला, भौतिकात रमू नका असे संत सांगून गेले आणि रसायन मला एखाद्या गोष्टीचा रस बनविण्याची पद्धत वाटत होती.
उरला विषय *चित्रकला* , त्यात मी फक्त अमिबाचे चित्र चांगल्याप्रकारे काढू शकत होतो.
थोडक्यात काय तर संतांची शिकवण मी पूर्णतः अमलात आणली आहे... ते सांगून गेलेत... 'विषयाची आवड माणसाच्या पतनाचे कारण बनते.'😂😂
Comments
Post a Comment