भाकरी’ हिसकावणारा `धर्म’
*दै.देशोन्नती*/ २२ एप्रिल २०२२
*`भाकरी’ हिसकावणारा `धर्म’*
*🖋️ लोकनाथ काळमेघ*
_धार्मिक सलोखा बिघडावा, त्यातून दंगली घडाव्यात आणि या दंगलींच्या रखरखत्या वातावरणात आपण आपली राजकीय पोळी शेकून घ्यावी, हा या दंगलखोरांचा एकमेव उद्देश असतो. प्रत्यक्षात दंगलीत हजेरी लावणारे मात्र भाकरीच्या तुकड्यासाठी मोहताज होतात._
गेल्या काही दिवसांपासून देशात हिजाब, गोमांस, मशिंदीवरील भोंगे यावरून धार्मिक तणाव निर्माण केला जात आहे. अशावेळेस राज्यकर्त्यांचे धोरण या सशस्त्र संघटनांना संरक्षण देणारे वाटत आहे. राज्यकर्ते याबाबत मौनात आहेत. धर्मरक्षणाचा भार उचलणारे कार्यकर्ते भांडत आहेत. यामधून मोठ्या दंगलीचे संकेत मिळत आहेत. गरज नेमकी काय आहे, हे जर जनतेला समजले नाही, की धार्मिक आणि जातीय प्रोपगंडा लोकांची माथी भडकवतो. हा प्रोपगंडा करणारे वर्षानुवर्षे सातत्याने चिकाटीने आणि प्रतिकूल परिस्थितीतही लोकांचे डोके फिरविण्याचे काम करीत असतात. या प्रोपगंडाचे दृश्य परिणाम म्हणजे देशातील बहुसंख्य तरूण, तरुणींना आणि मध्यमवर्गाला (मुख्यत: मध्यम जातींमधील समाज समूह) आज या हिंदुत्ववादी विचारप्रवाहाने दिलेली `आम्ही हिंदू’ ही अस्मिता आपली वाटत आहे. ज्यांची डोकी पूर्णपणे बिघडली अशांना `आम्ही’ (म्हणजे हिंदू) आणि विरुद्ध `ते’ (म्हणजे मुस्लिम) किंवा याच्या उलट जरी समीकरण जुळवले तरी हा युक्तिवाद म्हणजे प्रभावी `राजकीय तत्त्वज्ञान’ वाटते. मग त्यातून एकमेकांच्या प्रार्थनास्थळांबद्दल द्वेष, नामस्मरणावरून द्वेष, अंगावरच्या कपड्यांवरून द्वेष; यामधून मग मॉब लिंचिंग, दंगली, एकमेकांची घरे, दुकाने, देवस्थाने जाळपोळ करणे इत्यादी घटना घडतात. मग धर्म ही जर गरज आहे, तर या धर्मामुळे इतके भयंकर परिणाम घडत असतील तर कार्ल मार्क्स म्हणतात तसे `धर्म ही अफूची गोळी आहे’, हे कुठे चुकले?
या धार्मिक अस्मितेबाबत सहानुभूती असणार्या लोकांशी कोणताही अर्थपूर्ण राजकीय संवाद कुणीही करु शकत नाही, इतकी ही नशा भयंकर आहे. अर्थातच, कट्टर हिंदुत्ववादी असो, की कट्टर इस्लामिक या दोन्ही गटांसमोर तात्विकतेच्या आधारावर आपले विचार कुणीही मांडू शकत नाही. सध्याच्या घडीला भाजप आणि हिंदुत्ववादी विचारप्रवाह भारत हे एक `हिंदू राष्ट्र’ आहे असे गृहित धरून आपली सर्व राजकीय धोरणे आखत आहे, राबवत आहे. जातीय उतरंड नव्याने पुनरुज्जीवित केली जात आहे; मुस्लिम आणि अन्य धार्मिक अल्पसंख्यांकांवर `दुय्यम नागरिकत्व’ लादले जात आहे, तसतसे इस्लामिक देखील कट्टरवादी बनत चालले आहेत. त्यांचेही मेंदू गंजत चालले आहेत. हे दोन्हीही गट एकमेकांच्या उन्मादाला खतपाणी घालत आहेत. या दोन्ही गटांच्या म्होरक्यांची मुले विदेशात शिकत असताना मध्यम आणि सामान्य गरीब जातींमधील समाज समूह मात्र भरडत चालला आहे. स्वातंत्र्यापासून देशाने स्वीकारलेल्या संवैधानिक मूल्यांशी आणि धोरणांशी अत्यंत विपरित अशी ही वाटचाल आहे.
सध्या महाराष्ट्रातील मशिदींवरील भोंगे हटवले नाहीत, तर मशीदींसमोर जाऊन आम्ही जोरजोरात हनुमान चालिसा पठण करु, अशा घोषणा सुरू आहेत. या घोषणा देणाऱ्यांच्या मुलांचा यात सहभाग दिसणार नाही. प्रत्यक्षात हनुमान चालिसा पठण करणाऱ्यांमध्ये आणि मशिदींवरील भोंगे उतरवणाऱ्यांमध्ये आणि जर दंगली झाल्यात तर त्यामध्ये एकमेकांची डोकी फोडणाऱ्यांमध्ये आणि वेळ पडल्यास पोलीसांचा लाठीचार्ज खाणाऱ्यांमध्ये गरीब, शोषित, पीडित कुटुंबातील तरूण दिसतील.
२०१४ मध्ये केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर देशात हिंसा आणि जमातवादाने उच्चांक गाठला. गेल्या काही वर्षांत धर्मांधतेच्या विरोधात भूमिका घेणारे, सांस्कृतिक विविधता आणि बहुलतावादाचा पुरस्कार करणारे विवेकवादी विचारवंत, पत्रकार, साहित्यिक-कवी-कलाकार, वैज्ञानिक यांना धमक्या, हल्ले आणि खुनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. सामाजिक माध्यमांतून नियोजनपूर्वक ट्रोलिंग केले जात आहे. जात, धर्म, वंश, भाषा अशा मुद्द्यांवर आधारित विद्वेष पसरवण्याचे कामही मोठ्या प्रमाणावर चालू आहे. संघ परिवार आणि भाजपचे पदाधिकारी, मंत्री जाहीरपणे संविधान विरोधी वक्तव्ये करत आहेत. संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय व धर्मनिरपेक्षता ही तत्त्वे धोक्यात आली आहेत. विशेष म्हणजे आता हे सारे राष्ट्रवादाच्या नावाखाली खपवले जात आहे. `शुद्ध हिंदुत्वाचा नारा’ हे एक राजकीय अस्त्र बनले आहे. हिंदुत्ववाद ही एक राजकीय परिभाषा बनली आहे.
धर्म ही संकल्पनाच मुळात माणसाला विकासापासून कोसो दूर नेऊन सोडणारी ठरली आहे. त्यामुळेच महापुरुषांनी सर्वप्रथम समाजाला वळण लावण्यासाठी धर्मापासून दूर ठेवले होते. राजर्षी शाहू महाराजांनी मंदिर बांधले नाही, तर हिंदूंसाठी बोर्डिंग काढले. मशीद बांधली नाही, तर मुस्लिमांचे बोर्डिंग काढले. जैन मंदिर बांधले नाही, तर जैनांसाठीही बोर्डिंग काढले. सर्व जाती-धर्मीयांसाठी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. मोफत आणि सक्तीचे शिक्षण या संकल्पनेचे निर्मातेच राजर्षी शाहू महाराज होते. त्यांना ठाऊक होते, की मंदिर-मशीद बांधले तर भक्त वाढतात, अंधभक्त वाढतात, भिकारी तयार होतात, दक्षिणेवर पोट भरणारे भटजी जन्म घेतात, ते सर्वसामान्यांना लुबाडतात. माणसे घडवायची असतील तर शाळा पाहिजेत, सर्व सोयीसुविधा पुरविणारे बोर्डिंग पाहिजेत, बेरोजगारमुक्त समाजनिर्मितीसाठी उद्योगधंदे पाहिजेत, ग्रामीण जीवन आणि कृषीउद्योग भरभराटीला आणण्यासाठी धरणे पाहिजेत. महाराजांनी हे सगळे केले. मात्र, फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांनी महापुरुषांच्या विचारांशी गद्दारी केली. महापुरुषांनी जे केले ते यांना नको आहे, कारण समाज घडू नये, तर बिघडावा, असे यांना वाटत असते. कुणीतरी अचानक उठून उभा होतो आणि अचानक मंदिर, मशीद, हिंदू, मुसलमान अशा गोष्टी करतो. कुणी मशिदीवरील भोंगे, हनुमान चालिसा किंवा जय श्रीरामचे नारे देऊन, तर कुणी अल्लाहच्या नावाने ऊर बडवतो. धार्मिक सलोखा बिघडावा, त्यातून दंगली घडाव्यात आणि या दंगलींच्या रखरखत्या वातावरणात आपण आपली राजकीय पोळी शेकून घ्यावी, हा या दंगलखोरांचा एकमेव उद्देश असतो. प्रत्यक्षात दंगलीत हजेरी लावणारे मात्र भाकरीच्या तुकड्यासाठी मोहताज होतात. हे सगळे भयंकर आहे...
मो. : ९०९६४९४८९४
इमेल : loknathkalmegh@gmail.com
#हिंदू #HinduRashtra
Comments
Post a Comment