शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे

आदरणीय श्री. घोरपडे साहेब आणि सर्व सन्माननीय सदस्य महोदय - महोदया,  

सस्नेह नमस्कार. 

आपल्या सदिच्छांबद्दल कृतज्ञतापूर्वक धन्यवाद. 

नाशिक जिल्हा कोषागार कार्यालयात निवृत्तीवेतन विषयक कामकाजाच्या निमित्ताने आलेल्या अनुभवासंबंधी सौ.कल्याणी रवींद्र पाठक – कुलकर्णी यांनी समाजमाध्यमांवर प्रसृत केलेल्या संदेशामध्ये नाशिक जिल्हा कोषागार कार्यालयाबरोबर ओघाने माझाही नामोल्लेख झाला आहे. सदर संदेश सर्वदूर अनेक Whatsapp समूहांवर अग्रेषित करण्यात आल्यामुळे नाशिक जिल्हा कोषागार कार्यालयाबद्दल तसेच तेथे कार्यरत अधिकारी आणि कर्मचारीवृन्दाबद्दल आस्था आणि आत्मीयता असणा-या अनेक मित्र-आप्त-सहकारी-वरिष्ठ आणि निवृत्तीवेतनधारक यांचेकडून आम्हा सर्वांवर कौतुकाचा भरभरून वर्षाव करण्यात आला.

वस्तुत: सदर बाब कोषागार कामकाजाचा एक नियमित भाग असून निवृत्तीवेतनधारकांप्रती अशा प्रकारची तत्परता आणि संवेदनशिलता सर्वच कोषागार कार्यालयांकडून वारंवार प्रदर्शित करण्यात येत असते. आम्ही देखील तशीच कर्यवाही आमच्या कर्तव्याचा भाग म्हणून केली आहे. परंतु सौ. कल्याणीताईंनी अगदी छोट्याशा गोष्टीसाठी भारावून जाऊन आमची आवश्यकतेपेक्षाही कितीतरी जास्त प्रशंसा केली आहे, तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. सौ. कल्याणीताईंच्या भावनांचा आदर म्हणून त्यांचे प्रशस्तीपत्र विनम्रपणे स्वीकारणे क्रमप्राप्त ठरते.

वस्तुत: सौ. कल्याणीताईंना आलेला अनुभव प्रत्येक नागरिकाला  प्रत्येक शासकीय कार्यालयात / सार्वजनिक आस्थापनेमध्ये प्रत्येक वेळी येणे अभिप्रेत आहे. मात्र आपण जेंव्हा नागरिक म्हणून छोट्या - मोठ्या कामांसाठी शासकीय यंत्रणांना सामोरे जातो, तेंव्हा शासकीय व्यवस्थेचा एक भाग असूनही आपणाला देखील कसा अनुभव येतो, याची वाच्यता न केलेलीच बरी. शासन व्यवस्थेत कार्यरत अधिकारी - कर्मचारी यांचेसाठी शासकीय नोकरी हि फक्त नोकरी नसून सेवा असते. तसेच ती केवळ उपजीविकेचे एक साधन नसून, प्रतिष्ठा आणि वित्तलब्धींसह समाजसेवेची उत्तम संधी सुद्धा असल्याची जाणीव प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी सदैव ठेवली तर शासकीय कार्यालयास दिलेली प्रत्येक भेट नागरिक एक अविस्मरणीय अनुभव म्हणून स्मरणात ठेवतील.

शेकडो वर्षांच्या दमनकारी राज्यव्यवस्थांचा अंत करून अहिंसेच्या मार्गाने विसाव्या शतकाच्या मध्यावर सर्वसामान्य भारतीय जनेतेने अतुलनीय त्याग करून अत्यंत चिकाटीने मिळवलेल्या स्वातंत्र्यानंतर  अंगीकारण्यात आलेली सांप्रत शासन व्यवस्था हि मुलत: कल्याणकारी व्यवस्था आहे. आताचे शासन हे पूर्वीसारखे ‘मायबाप’ शासन नसून ‘सेवाभावी’ शासन आहे. सुशासन हा या शासन व्यवस्थेचा स्थायीभाव आहे. या वस्तुस्थितीचे भान या शासन व्यवस्थेत विविध टप्प्यांवर कार्यरत असणा-या  प्रत्येकाने सदैव ठेवले पाहिजे.

परम पवित्र संविधान आणि त्यांतर्गत अधिनियमित करण्यात आलेल्या विविध अधिनियम – नियम – विनियम यापैकी कोणत्याही संलेखाचे ओझरते जरी अवलोकन (Cursory perusal)आपण  केले, तरी त्यातील प्रत्येक शब्द-न्-शब्द  नागरिकांचे कल्याण आणि उत्थान आश्वासित करण्यासाठीच योजलेला आहे, हि बाब सातत्याने अधोरेखित होत असल्याचे आपल्या लक्षात येईल. प्रख्यापित करण्यात आलेले सर्व नियम आणि विहित करण्यात आलेल्या सर्व कार्यपद्धती या नागरिक केंद्रित आणि समाजाभिमुख आहेत आणि  त्या अंतिमत: नागरिकांच्या सोयीसाठी आणि सार्वजनिक हितसंबंधांचे संवर्धन करण्यासाठी निर्माण केलेल्या आहेत, या वस्तुस्थितीची  जाणीव सर्व कार्यान्वयन आणि विनियामक यंत्रणांमध्ये कार्यरत अधिकारी-कर्मचारी यांनी ठेवली पाहिजे.

सर्वसामान्य नागरिकांनी शासनास प्रदान केलेल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या माध्यमातून राजकोष समृद्ध होत असतो. असा हा समृद्ध राजकोष नागरिकांमुळेच अक्षय असतो. या राजकोषातूनच शासकीय अधिकारी – कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा केले जात असतात. राजकोष हा नागरिकांच्या मालकीचा असून त्याची विश्वस्त व्यवस्था म्हणून शासन अस्तित्वात आलेले आहे. त्यामुळे जनता मालक असून शासन सेवक आहे. शासन जनतेचे मायबाप नसून जनताच शासनाची मायबाप असल्यामुळे संपूर्ण शासन व्यवस्था जनतेप्रती संसदीय प्रणालीच्या माध्यमातून उत्तरदायी असते. त्यामुळे प्रचलित  नियम – विनियम – कार्यपद्धतींच्या  चौकटीला  मानवतेचे  आणि सहृदयतेचे कोंदण लाभले तर ती अधिक उपयुक्त आणि परिणामकारक सिद्ध होईल.

नागरिक प्रसंगानुरूप शासकीय कार्यालयांना अपरिहार्यता म्हणून भेटी देत असतात. त्यांची कामे शासकीय व्यवहारांच्या तुलनेत अतिशय छोटी आणि साधी-सुधी असतात. त्यांना सर्वच शासकीय नियम आणि कार्यपद्धतींची सखोल माहिती नसते. त्यामुळे नियमांचा भंग आणि कार्यपध्दतीचे उल्लंघन होऊ न देता नागरिकांचे काम तत्परतेने झाले पाहिजे, यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी सकारात्मकतेने आणि स्वयंस्फुर्तीने जाणीवपूर्वक प्रयत्न केले, तर नागरिकांचा कालापव्यय होणार नाही – त्यांना शासकीय कार्यालयांमध्ये  हेलपाटे मारावे लागणार नाहीत. अशा पद्धतीची कार्यसंस्कृती जोपासल्यास जेथवर शासकीय कार्यालयांचा संबंध आहे तेथपर्यंत व्यक्तिगत पातळीवर नागरिक आणि सामुहिक पातळीवर समाज प्रथमत: संतुष्ट – समाधानी आणि त्यानंतर आनंदी होऊ शकतील अशी अपेक्षा करणे अतिशयोक्ती ठरणार नाही.      

राज्यातील सर्वच कोषागारे आपापल्या परीने निवृत्तीवेतन धारकांना तत्परतेने सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सातत्त्याने  करीत असतात. वाढलेल्या कार्यबाहुल्याच्या तुलनेत मनुष्यबळाची कमतरता जरी असली तरी निवृत्तीवेतनधारकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रत्येक कोषागार अधिकारी आणि त्याचे सर्व सहकारी अधिकारी आणि कर्मचारी सातत्याने प्रयत्नरत असतात. त्यामुळे  सौ. कल्याणीताईंनी व्यक्त केलेल्या भावना सर्वच कोषागारांना कमी-अधिक प्रमाणात लागू होतात. सौ. कल्याणीताईंचे प्रशस्तीपत्र हे जबाबदारीची जाणीव करून देणारे आहे.

आयुष्याच्या संध्याकाळी जेष्ठ नागरिकांच्या चेह-यावर समाधान आणि आनंद विलसित होताना पाहण्याचे भाग्य कोषागारात काम करणा-या आम्हा सर्वांना लाभले आहे.

आम्हा सर्वांमध्ये असलेली सामाजिक बांधिलकीची जाणीव उत्तरोत्तर आणखी वृधिंगत होण्यासाठी आपण केलेले कौतुक आणि दिलेल्या शुभेच्छा नक्कीच उपयुक्त ठरतील अशी खात्री आहे. 

पुन:श्च एकदा विनम्र धन्यवाद.

डॉ. राजेंद गाडेकर 
वरिष्ठ जिल्हा कोषागार अधिकारी आणि 
नाशिक जिल्हा कोषागार कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी वृंद.

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार