विस्मरणात चाललेले ग्रामीण मराठी शब्द
*विस्मरणात चाललेले ग्रामीण मराठी शब्द*
मराठी भाषेला समृध्द करणारे ग्रामीण भागातील दैनंदिन जीवनात सहजपणे वापरले जाणारे व काळाच्या ओघात काहिसे विस्मृतीत गेलेल्या शब्दांचा, संकल्पनांचा मागोवा...
जसजसे शेतीबाडीचं यांत्रिकीकरण होऊ लागलं, गावगाड्याला नागरीकरणानं भरकटून टाकल. गावाकडचं घर बदललं आणि ‘बंगलो स्किम’ आली.- मग ओटा, पडवी, न्हाणीघर, माजघर, शेजघर, माळवद, वासं-आडं, दिवळी, खुंटी, फडताळ, परसदार, पोत्यारं, चावडी, चौक,पार,पाणवठा, उंबरठा, कडी कोंडी,खुराडं,उकीरडा, हे शब्द विस्मरणात गेले.बैलगाडी जाऊन ट्रॅक्टर-यांत्रिकी अवजारं आल्यानं औत, रूमणं, चाडं, लोढणा, वेसण, झूल, तिफण, जू, वादी, कासरा (लांब दोर), दावं (लहान दोरखंड), चराट (बारीक दोरी) या शब्दांना आपण हरवून बसलो. विहिरीवरची मोट गेली, पंप आले. परिणामी मोट, नाडा, शिंदूर, धाव, दंड, ओपा, पलान हे शब्द दिसेनासे झाले. खुरपणी, मोडणी, मोगडणी, उपणणी, बडवणी, खुडणी, कोळपणी, दारं धरणं, खेट घालणं, माळवं यांचा अर्थ अलीकडच्या पिढीला समजत नाही. रास, सुगी, गंजी, कडबा,पाचुंदा, बोंडं, सुरमाडं, भुसकट, शेणकूट, गव्हाण या शब्दांचंही तसंच! धान्य दळायचं दगडी जातं, खुट्टा,मेख हेही काळाच्या पडद्याआड चाललेत.
साळुता आणि केरसुणी याऐवजी झाडू आला. चपलेला पायताण, गोडेतेलाला येशेल तेल, टोपडय़ाला गुंची म्हटलं जायचं, हे आता सांगावं लागतं.गावंदर, पाणंद, मसनवाट हे शब्द नागरीकरणामुळं मागं पडले. चांभाराची रापी, सुताराचा वाकस, कुंभाराचा आवा, लोहाराचा भाता, ढोराची आरी, बुरूडाची पाळ्ळी ही हत्यारांची नावं आता कुणाला आठवतात? पतीला दाल्ला (दादला), पत्नीला कारभारीण, सासर्याला मामंजी, सासूला आत्याबाई, नणंदेला वन्स, बहिणीच्या पतीला दाजी म्हणतात, हे आता नव्या पिढीला सांगावं लागतं, नाही का?
स्वयंपाकघराचं किचन झालं आणि कोरडयास (कोरडया पदार्थासह खायची पातळ भाजी), कालवण (ज्यात कालवून खायचे असा पातळ पदार्थ), माडगं, डिचकी, शिंकाळं, उतरंड, भांची, डेरा, दुरडी, बुत्ती, चुलीचा जाळ, भाकरीचा पापुद्रा, ताटली, उखळ,मुसळ हे शब्द नागर संस्कृतीनं बाजूला सारले.रविवार हा सुट्टीचा दिवस. निवांत असण्याचा दिवस म्हणून तो आयतवार (आईतवार), तर गुरुवार म्हणजे बृहस्पतीवार. त्याचा अपभ्रंश होऊन बेस्तरवार झाला.पहाटेच्या वेळेला ‘झुंझुरकं’, सकाळी लवकर म्हणजे ‘येरवाळी’ किंवा ‘रामपारी’ आणि सायंकाळला ‘कडुसं (कवडसे) पडताना’ अशी शब्दयोजना होती.अंगदट (बळकट), दीडकं-औटकं (एकपासून शंभर्पयतच्या संख्येची दीडपट-साडेतीनपट संख्या दाखवणारं कोष्टक), झोंटधरणी (भांडण), पेव (धान्य साठवण्याचं साधन) हे शब्दही आताशा हरवलेत.
इस्कोट (बिघडवणं), सटवाई (नशिब लिहिणारी देवता), सांगावा (निरोप), गलका (गोंगाट), मढं (मृतदेह), पल्ला (अंतर), शिमगा (होळी किंवा शंखनाद), चिपाड (वाळलेला ऊस), अक्काबाईचा फेरा (दारिद्रय़), अक्करमाशा (अनौरस), अवदसा (दुर्दशा), इडा-पीडा (सर्व दु:ख), कागाळी (तक्रार), चवड (रास, ढीग), ङिांज्या (केस), वंगाळ (वाईट), डोंबलं (डोकं), हुमाण (कोडं), भडभुंज्या (चिरमुरे, लाह्या भाजणारा)ही मराठी भाषेघ्ला ग्रामीण भागानं दिलेल्या शब्द भेटीतली वानगीदाखल उदाहरणं.
कृपया आपण देखील आपल्या शब्दसंग्रहात असलेले, आपल्या मनातील पिंपळ पानावर कोरुन ठेवलेले मात्र सद्या कालबाह्य झालेले शब्द व संकल्पनाच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करुयात.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment