श्रीमंत कोकाटे

*होय, आम्ही गुराखी आहोत,याचा अभिमान!*

                            विकृत पुरंदरेंच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर पुरंदरे भक्तांनी दिलेली प्रतिक्रिया अशी आहे "श्रीमंत कोकाटे हा कसला इतिहासकार, हा तर गुराखी!" ही प्रतिक्रिया ऐकून मला अजिबात राग आला नाही. याचा मला अभिमान वाटला, कारण मी शालेय जीवनात गुरे राखलेली आहेत. मी अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. माझे आई-वडील आज देखील शेतात काबाडकष्ट करतात. आम्ही पारंपरिक शेतकरी आहोत. लहानपणी मी शेतात नांगरणी, कोळपणी, खुरपणी, पेरणी तसेच पिकाला पाणी देणे, पाखरं राखणे, त्याबरोबरच शेळ्या, गाय बैल, म्हैस ही सर्व प्रकारची जनावरे राखलेली आहेत. त्यांना पाणी पाजणे, धारा काढणे,शेण झालवट  ही कामे केलेली आहेत. याचा मला संकोच नव्हे, तर अभिमान वाटतो. कारण मी शेतकरीपुत्र आहे. 

                              गुराख्यानां तुच्छ लेखणाऱ्या विकृत पुरंदरे भक्तांना मी सांगू इच्छितो की पंढरीच्या पांडुरंगाने चोखामेळ्याच्या प्रेमापोटी गुरे राखली होती, म्हणजे तो भक्तासाठी गुराखी झाला.महाभारत या महाकाव्यातील कृष्णाने गुरे राखली,अशी कथा आहे.लोकनेते भाई केशवराव धोंडगे दरवर्षी कंधार येथे गुराखी साहित्य संमेलन घेतात,ते एकदा पुरंदरे भक्तांनी ऐकावे,मग कळेल गुराख्यात काय ताकद आहे ते. खेड्यापाड्यांतील लोक गुरे राखतात, त्यामुळेच तुम्हाला दूध, दही, ताक, तूप, आईस्क्रीम खायला मिळते. गुराखी नसते तर हे पदार्थ खायला मिळाले असते का ?. एखादा व्यक्ती इतिहासकार आहे की नाही, ही मान्यता देण्याचा अधिकार सनातन्याना कोणी दिला? हा अधिकार विद्यापीठ व अकॅडेमिक क्षेत्राचा आहे,तो कोणत्या बाजार बुनग्यांचा नाही.आम्ही भिकाऱयांच्या मान्यतेसाठी हपापलेलो नाही.

                            शेतात काबाडकष्ट करत. जनावरे राखत मी शालेय शिक्षण पूर्ण केले. आम्ही संत तुकाराम महाराजांचे वारसदार आहोत. संत तुकाराम महाराजांनी शेतात काबाडकष्ट केले. संत तुकाराम महाराज नेहमी म्हणायचे "बरे झालो देवा कुणबी केलो । नाहीतरी दंभेची असतो मेलो ।" शेतकर्‍याच्या घरी जन्माला आलो याचा मला अभिमान वाटतो, भिक्षूकाच्या घरी जन्माला आलो असतो तर दंभ अहंकारने मातलो असतो, असे संत तुकाराम महाराज म्हणायचे.

                            उच्च शिक्षणासाठी बार्शी, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई आणि पुणे असा माझा प्रवास झाला. मी आज आज पाच विषयात पोस्ट ग्रॅज्युएट आहे, पाच विषयात डिप्लोमा आहे, इतिहास विषयात सेट आहे आणि शिवचरित्रवरती पीएच.डी. केलेली आहे. शिवचरित्रावरची ही महाराष्ट्रातील पहिली पीएच.डी. आहे.

                           मी जसा शेतकरी पुत्र आहे,तसाच शिवचरित्राचा अभ्यासक आहे. परंतु आपल्या देशात ब्राह्मणेतर हुशार, अभ्यासू असूच शकत नाहीत. हा अहमगंड सनातन्यांकडून पिढ्यानपिढ्या जोपासण्यात आलेला आहे. बहुजन समाजाला तुच्छ लेखणे, त्यांची हेटाळणी करणे, त्यांची टिंगल टवाळी करणे,त्यांना नाउमेद करणे हा सनातन्यांचा पारंपारिक धंदा आहे. आणि यातून कोणीही सुटलेले नाही. 

                            कृषक व ग्राम्य जीवनावर सुमारे पाच हजार अभंग लिहिणाऱ्या संत तुकाराम महाराजांना देखील सनातन्यांनी तुच्छ लेखले, परंतु संत तुकाराम महाराज त्यांना पुरून उरले. महात्मा फुले यांनी जनमानसाची अभिजात मराठी साहित्यात आणली. त्या फुलेंना चिपळूणकर म्हणाले होते "फुलांच्या साहित्यात व्याकरण नाही" तेव्हा फुले त्यांना म्हणाले "माझ्या साहित्यात व्याकरण नाही, परंतु जनमानसाचे अंतकरण आहे"  महात्मा फुले यांनी जी पाचर ठोकलेली आहे. ती अजून सनातन्यांना काढता आलेली नाही. इतके महात्मा फुले प्रतिभावान होते. ते फेटा घालत असत. शेतकऱ्यांच्या समस्येचे प्रतिनिधीत्व करत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे उच्चशिक्षित आणि विद्वान होते, राजर्षी पदवीने सन्मानित होते, परंतू कृषक जीवनाचा अंगीकार करुन शेतकरी, गुराख्यांना सन्मानित करत.

                           आधुनिक काळात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उंचीचा विद्वान सनातन्यामध्ये अजून झालेला नाही आणि ती होण्याची शक्यता नाही. त्यांची शेतकऱ्यांच्या खोतीसमस्ये विषयीची आंदोलने विख्यात आहेत. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे लंडन येथील विद्यापीठात "धर्माचा तौलनिक अभ्यास" या विषयावरती पीएच.डी. मिळवणारे महान विद्वान होते. भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी "वैदिक वाङ्मयातील धर्माचा उदय आणि विकास" या विषयावरती पीएच.डी. मिळविली ते टोपी घालत असत. दोघेही कृषक पार्श्वभूमीचा अभिमान बाळगत. भास्करराव जाधव हे मोठे विद्वान ग्रहस्थ होते. त्यांनी रामायणावरती महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला आहे. ते फेटा वापरत असत. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारखा प्रभावी, परखड वक्ता स्वातंत्र्यलढ्यात झाला नाही.ते टोपी व खेडूतासारखा सामान्य वेष परिधान करत असत. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे दीड दिवस शाळा शिकले. ते जागतिक कीर्तीचे साहित्यिक होते. त्यांच्या अनेक कादंबऱ्या जगभरातील अनेक भाषेत अनुवादित झाल्या. त्यांनी स्टॅलिनग्रांडचा पोवाडा लिहिला. तो रशियातील प्रत्येक घरात गायला जातो. त्यांच्या लिखानाचा केंद्रबिंदू ग्रामीण, कृषक, गुराख्याचे जीवनच राहिला.

                          मॅट्रिक पर्यंत शिक्षण झालेल्या, आपल्या गावी शेती केलेल्या शरद पाटलांनी प्राच्यविद्यामध्ये आमूलाग्र क्रांती केली. त्यांचे साहित्य जगविख्यात आहे. शेतात शेळ्या राखून शिक्षण घेणारे बी. जी. शिर्के हे जगविख्यात बांधकाम व्यावसायिक होते. त्यांनी पुण्याच्या सीओईपी या जगविख्यात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. ज्या शेतात त्यांनी शेळ्या राखल्या त्याच शेतात ते स्वतःचे हेलिकॉप्टर घेऊन आले. इतके ते मोठे होते.

                         भाषेवरून, उच्चारावरून, पेहरावावरून बहुजन समाजातील प्रतिभावंतांना गुराखी, गावंढळ म्हणून हिणविणाऱयांना मी सांगू इच्छितो "गुणवत्ता, विद्वत्ता, प्रतिभा ही कोणाची मक्तेदारी नाही"  सनातनी आणि द्वेषभावनेने भटाळलेले लोक सातत्यानं नवोदित तरुण-तरुणींना नाउमेद करण्याचा प्रयत्न करत असतात. धडपडणाऱ्या, ग्रामीण भागातून येणाऱ्या तरुण-तरुणींना तुच्छ लेखणे, त्यांना भाषेवरून, उच्चारावरून, लेखणीवरून नाउमेद करणे, अशी कटकारस्थाने करत असतात. याची अनेक उदाहरणे आहेत.

                        पुरंदरे भक्तांना मला एवढेच सांगायचे आहे. मी शेती करतो, गुरे राखतो, इतिहास लिहितो-सांगतो, परंतु आम्ही पुरंदरे सारखे विकृत नाही. आम्ही छत्रपती शिवाजीराजे यांच्या विचारांचे अनुयायी आहोत. शिवाजीराजांनी आम्हाला शत्रूच्या स्त्रियांचा देखील आदर करायला शिकविले. आम्ही पुरंदरे यांच्या पत्नीचा, मुलीचा, सुनेचा, नातींचा,ज्ञाती स्त्रियांचा आदर करतो. पुरंदरेना मात्र शिवरायांच्या मातेचा आदर करता आला नाही. ज्या शिवाजीराजांनी सांगितले होते की शत्रूच्या स्त्रियांचा देखील आदर करा. पुरंदरेनी मात्र त्यांच्या मातेचा देखील आदर केला नाही. आम्ही शत्रूच्या स्त्रियांचा देखील आदर करणारे लोक आहोत. कारण आम्ही शेतात काबाडकष्ट करणारे गुराखी लोक आहोत. दुसऱ्याच्या भिक्षेवर (भिकेवर) जगणारे बांडगुळ नाहीत. कारण आम्ही गुराखी आहोत आणि याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही पळी पात्र पंचांगावरती जगून स्त्रियांचे-महापुरुषांचे चारित्र्यहनन करणारे विकृत लोक नाहीत. पुरंदरे दोनशे वर्षे जरी जगले तरी आमच्या मनात यत्किंचितही आदर राहणार नाही, कारण त्यांनी शिवचरित्राचा सत्यानाश केलेला आहे.

                          शिवरायांच्या मावळ्यांची, महिलांची यथेच्छ बदनामी केलेली आहे. पुरंदरेनी शिवचरित्र हे घरोघरी नेले, असा युक्तिवाद पुरंदरे भक्त करत असतात. त्यांना मला सांगायचे आहे की माझ्या वडिलाचे नाव शिवाजी आहे. ते काय पुरंदरेनी ठेवलेले नाही. या महाराष्ट्राच्या जनतेच्या नसानसात शिवाजी आहेत. ते आम्हाला पुरंदरेनी शिकवायची गरज नाही. ते आम्हाला महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, राजारामशास्त्री भागवत, डॉ. बाळकृष्ण, कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, वा. सी. बेंद्रे, सेतू माधव पगडी, प्रबोधनकार ठाकरे, कॉ. गोविंद पानसरे,शरद पाटील, डॉ. जयसिंगराव पवार, ज्ञानेश महाराव आणि आमच्या वाडवडिलांनी शिकवलेले आहे.

                            शिवचरित्रामुळे 'विकृत ब.मो.पुरंदरे' लोकांना माहिती झाले, पुरंदरेमुळे शिवचरित्र नव्हे. आम्हाला गुराखी म्हणून हिणविणाऱ्यां पुरंदरे भक्तांना मी सांगू इच्छितो, "होय, आम्ही शेतकरी, गुराखी आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. पुरंदरेनी ज्या तुच्छतेने इतिहास लिहला, त्यांना मिळालेले अनुयायीही तसेच तुच्छता बाळगणारे. गुराख्याविषयी, शेतकऱ्याविषयी, शिवाजी राजांच्या मावळ्याविषयी, महिलांविषयी सतत तुच्छता व्यक्त करतात हे पुरंदरेभक्त. पुरंदरे! जसा इतिहास पेराल, अनुयायीही तसेच मिळणार. आमच्या सारखी शेती करून, गुरे राखून इतिहास लिहा! खरे शिवाजी राजे समजतील...

                      ...आणि माझे पुरंदरें भक्तांना नम्रतापूर्वक आव्हान आहे की पुरंदरे यांच्यासोबत शिवचरित्रावर कधीही, कोठेही चर्चा करायला तयार आहे. कारण मी माझ्या शिवाजी राजांना कोट्यावधी शेतकऱ्याच्या, गुराख्याचे नजरेतून, अंतकरणातून पाहतो. ती नजर, ते अंतकरण शिवाजी राजांप्रती नेहमीच कृतज्ञ राहिलेले आहे, ते ब.मो.पुरंदरेसारखे कधीच विकृत झालेले नाही."
                                                         --डॉ. श्रीमंत कोकाटे

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार