पाऊस कोपलाय
लोक म्हणताहेत पाऊस कोपलाय
वर्षाची सरासरी अवघ्या काही दिवसांत गाठत तो वेड्यासारखा कोसळतोय.
असं काही नाही. त्याचं कुठं काय चुकलंय ?
पूर्वी तो वेळेवर न चुकता जूनच्या पहिल्या आठवड्यात यायचा आणि सप्टेंबर अखेर पर्यंत दमादमाने आस्ते कदम बरसत राहायचा.
शाळेच्या सुरुवातीला पोराठोरांसंगे दंगा करायचा, ज्येष्ठात तांबड्या मातीतल्या भातशेतीतून लोळण घेत शिवारभर फिरून दमल्यावर कौलारू घरांवरून घसरगुंडी खेळायचा
आषाढात वारकऱ्यांच्या पायात घुटमळत दिवेघाटातून दरवळत राज्यभरात घुमायचा, काळ्या मातीत पेरलेल्या बीजांना गोंजारायचा.
आभाळमाया करायचा, सह्यकड्यापासून सातपुड्यापर्यंत डोंगररांगांवर अभिषेक करायचा
वसिष्ठीला वंदन करुन तापीच्या पायावर लीन व्हायचा, त्याचा हा प्रवास ठरलेला असायचा...
वाटेतल्या बांधांबांधांवर वडिलकीच्या मायेने हात फिरवायचा, एखाद्या चंद्रमौळी झोपडीत वाकून बघताना गहिवरून यायचा,
ओल्या बाळंतीणीच्या अंधारल्या खोलीत डोकावून पाहताना बाळाच्या मखमली पायाला गुदगुल्या करायचा
गावागावातल्या मंदिरांची शिखरे अन मस्जिदींचे मीनार स्वच्छ धुवून काढायचा
वेशीवरच्या जीर्ण पिंपळाला आलिंगन द्यायचा, पारावरच्या वटवृक्षाच्या पारंब्यांशी झोंबायचा.
गावकुसातल्या म्हाताऱ्या कोताऱ्यांच्या डोईवरल्या चांदीला स्पर्श करुन अंगणातल्या तुलसी वृंदावनाला वंदन करायचा
पांदीतल्या आंब्यापाशी आठवणींची सय कुशीत घेऊन झोपायचा तर गावांच्या शिवेपाशी थरथरून जायचा
ओढ्यांच्या कडेने वाहताना अनंतात लीन झालेल्यांचे अस्तित्व शोधत फिरायचा
कडेवर नातवंडे घेऊन चाललेल्या वृद्धांच्या भाळाचे चुंबन घ्यायचा
मातीत कोसळून अंकुराच्या देठातून उगवून यायचा
म्लान झालेल्या गवतफुलांना लकाकी द्यायचा
पूर्वीचा पाऊस म्हणे बोलायचा, माणसंच नव्हे तर झाडंझुडपं पशू पक्षी देखील त्याच्याशी संवाद साधायचे.
पहिल्या पावसाच्या वेळी त्याला वंदन व्हायचे, तळे तुडूंब भरल्यावर ओटी भरायचे
पाऊसही मग जाम खुश व्हायचा म्हणे, आपल्या लेकरांवर तालासुरात कोसळायचा
श्रवणात माहेरी आलेल्या माहेरवाशिणींच्या डोळ्यातून वाहायचा, तिच्यासंगे ऊंच झुल्यावर विहरताना रडता रडता हसायचा
भाद्रपदात पावसाची पावले जड व्हायची, गोठ्याचे दावे तोडून गेलेल्या वासरासारखा करायचा
लहर आली तर परत यायचा, नाहीतर माळांवरच्या झाडांत दडून बसायचा
निरोप घेताना तो ओक्साबोक्शी रडायचा, घरादाराला आशीर्वाद देऊन जायचा
सूरपारंब्या खेळताना फांद्यांवर खुणा केलेल्या असत तिथं रेंगाळायचा
शहरातल्या डांबरी सडकांवर इंद्रधनुष्य रेखाटायचा, बागेत बसलेल्या जोडप्यासंगे ओला कंच होऊन जायचा
गल्लीच्या कोपऱ्यावरल्या टपरीवर चहाच्या वाफाळत्या चॉकलेटी द्रावणावर जीव लावायचा
भिजून घरी गेलेल्या चाकरमान्यासंगे घरात मुक्त शिरायचा आणि थकेलेल्या आईच्या हातची गरमागरम भजी खाऊन पुन्हा बाहेर पडायचा, नव्याने कोसळण्यासाठी
प्रेमिकांच्या पहिल्या आलिंगनाशी एकजीव होताना पुरता रोमॅण्टिक व्हायचा, तिच्या गालावरून ओघळत यायचा आणि त्याच्या ओठांवर स्थिरावायचा
चेन पडलेल्या सायकलमागे फरफटत जायचा आणि हायवेवरून सुसाट जाणाऱ्या गाड्यांच्या चाकांशी स्पर्धा करायचा.
कोसळताना तो काळी तांबडी माती असा भेद नव्हता करत, बोरी बाभळींनाही माया लावायचा आणि बकुळ प्राजक्तांवरही प्रेम करायचा
पूर्वी त्याचे काही शिरस्ते होते, त्याचा एक मौसम होता, त्याची एक पद्धत होती, त्याचं एक वेळापत्रक होतं.
पूर्वी माणसांचंही वेळापत्रक होते म्हणे..
आता लोकांपाशी वेळच उरला नाहीय. सगळयाची घाई आहे, सावकाश निगुतीचं काही उरलंच नाही.
खाणं पिणं असो वा असो झोपणं, सगळं घाईतच असतं.
मनमुराद गप्पादेखील होत नाहीत, फुरसतीनं भटकणं होत नाही
व्यक्त होण्याचीही घाई असते, नावालाच बोलायचे असते मन मात्र जागेवर नसते.
पूर्वी घराबाहेर पडताना उंबऱ्यापाशी हलणारा हात असायचा, अंगणातली जाई आणि प्रेमळ आई असायची
रस्त्यांनी घाई, जायची घाई यायची घाई. ब्रेकअपची सुद्धा आताशा घाई असते
मने जुळायच्या आधीच तुटायची आस असते, कुठले छंद उरले नाहीत की कुठल्या आवडी हौसेने राहिल्या नाहीत
सिनेमे महिनोनमहिने थियेटरवर असत आता चारच दिवसांत त्यातली मजा संपलेली असते
एखादं गाणं वर्षभर ऐकत राहायचे आता दिवसागणिक हिट गाणं बदलतं
रोज रोज थोडे थोडे पैसे साठवत असत आता जॅकपॉटसाठी तिष्ठतात
मिनिटाला बिग ब्रेकिंगची बातमी बदलते त्यातलं मूल्यही तासात संपून गेलेलं असतं
सकाळची गोष्ट संध्याकाळी राहत नाही, रात्रीच्या आणाभाका सकाळी स्मरत नाहीत
महिन्याचं काम एका दिवसांत करायचं असतं वर्षाचं पिक एका महिन्यात काढायचं असतं
सालभराची कमाई तासात हवी असते, सणवाराला माहेरी यायची ओढ नुरते
मौतीला सुद्धा आता माणसं येत नाहीत, आरआयपीचा मेसेज पाठवतात
आईपाशी बसायला लेकाला वेळ नाही आणि पतीच्या छातीवर मस्तक टेकवायला पत्नीला उसंत नाही
मैदानांवर खेळासाठी मुलांना सवड नाही, पुस्तके ही तिष्ठत असतात वाचणाऱ्या हातांच्या प्रतिक्षेत
सालं ते प्रेमसुद्धा इन्स्टंट असतं सकाळी दृष्टादृष्ट झाल्यावर दुपारीच आडोसा शोधत फिरतं
श्रमलेल्या पायांवर मस्तक टेकायची ओढ नसते कुणाला, श्रमलेल्या हातांना धन्यवाद द्यायला आवडत नाही कुणाला
विचारलाच जाब कुणी तर सरळ सरळ उत्तरतात - वेळच नाही हो कुणाकडे, हल्ली टाईम भेटत नाही !
पावसाचंही तसंच झालंय,
आताशा वेळ नसतो त्याच्याकडे. वर्षाची सरासरी एका दिवसांत गाठतो
कधी कधी महिनाभर येत नाही कुठे तरी बिझी असतो,
अचानक येतो मग सुट्टीवर एक दिवसासाठी घरी परत आलेल्या मुलासारखा, पहाटेच येतो रात्रीस परतण्याचे वेध डोळ्यात घेऊन !
विचारलं तर म्हणतो आता मन रमत नाही गं आई !
पावसाचंही तसंच झालंय त्याचं आता मन रमत नाही,
आता तो बसरतो फक्त बॅकलॉग भरण्यासाठी, त्याच्याकडे वेळ उरला नाही
तो कुणाची विचारपूस करत नाही की कुणाच्या मस्तकावरून मायेचा हात फिरवत नाही..
मित्रांनो पाऊस बदललेला नाही, तो तर आपल्यासारखंच वागतोय.
मग त्याला दोष देऊन कसे चालेल ?
- ----
Comments
Post a Comment