देवाची सायकाॅलाॅजी

देवाची सायकाॅलाॅजी 

एखादा रोग बरा झाला नाही की तो का बरा झाला नाही हे कारण समजत नाही..
काही रोग बरे का होत नाहीत या मागचे कारण समजत नाही... 
अनेक वेळा आपली कामे सर्व काही नीट असून देखील होत नाहीत... 
अचानक एखादी गोष्ट घडते आणि ती तशी का घडली हे समजत नाही... 
..म्हणजे इथे "कारण" हे "अज्ञात" असते. 
कोव्हीड रोगावर औषध नाही. या रोगामुळे कोण मरेल आणि कोण जगेल हे सांगता सांगता येत नाही. म्हणजे इथे या मागील कारण अज्ञात आहे... 
या विश्वाचा उगम आणि अंत काय असेल हे कारण सांगता येत नाही... 
- म्हणजेच, थोडक्यात 'कारण' हे 'अज्ञात' आहे. 
अज्ञात असे कोणतेही कारण जेव्हा आपणास शोधता येत नाही, सांगता येत नाही, बोलता येत नाही तेव्हा आपण या अज्ञात कारणासाठी, कारणाला,  आपण नाव देतो..
"देव". 
म्हणजे, थोडक्यात देव म्हणजे अज्ञात कारणाला दिलेले नाव. जेव्हा एखादा पेशंट जगण्या-मरण्याच्या सीमारेषेवर असतो तेव्हा तो वाचेल की नाही याची खात्री नसते. कारण, 'कारण' अज्ञात असते. अशावेळी सामान्य लोक म्हणतात आता देवावरच शेवटी भरोसा ! याचा अर्थ अज्ञात कारणावर तो भरोसा असतो. 
इथे अज्ञात कारण हे आपली समजूत घालण्यासाठी आपण मानत असतो. शतकानुशतके या अज्ञात कारणाला देव म्हणण्याची प्रथा पडली आहे. पूर्वी देवी हा रोग होता, ज्याला इंग्रजीत स्मॉल पाॅक्स असे म्हणतात. त्या देवी रोगामागील जेव्हा कारण अज्ञात होते तेव्हा हा रोग म्हणजे देवीचा प्रकोप होय आणि त्यामुळे माणसे पटापट मरत आहेत असे कारण जेव्हा तयार झाले तेव्हा देवीची पूजा-अर्चा-विधी सुरू झाले. गावोगावी देवीचा गाडा फिरवणे सुरू झाले. आजही कोव्हीड रोग बरा होत नाही अशी समजूत पसरल्यामुळे अनेक ठिकाणी कोरोना देवीची स्थापना झाली. याचा अर्थ...
अज्ञात शक्ती असे नाव अज्ञात कारणाला देण्यात आले. 
अज्ञात कारण हे जेव्हा विज्ञानाने शोधून काढले तेव्हा ते ते देव नाहीसे झाले. देवी रोग हा विषाणूमुळे होतो हे जेव्हा विज्ञानाने शोधून काढले तेव्हा अज्ञात कारण सापडले आणि त्यानंतर देवीचा गाडा फिरविणे बंद झाले आणि देवी हे रोगाचे नाव देखील नाहीसे झाले. जेव्हा माणूस संकटात सापडतो तेव्हा त्याची मनस्थिती स्थिर नसते. अशावेळी जर कारण अज्ञात राहिले तर त्या व्यक्तीच्या विचारात दोष किंवा बिघाड निर्माण होतात. उदाहरणार्थ, जर घरातील लहान बाळ रडत असेल व ते का रडते याचे कारण समजत नसेल तर काही तरी अज्ञात घडते आहे आणि बाळाला त्रास देते आहे असा "विचार घाईघाईने" डोक्यात येतो. म्हणजेच हा विचार पटकन स्वतःला स्थिर करण्यासाठी आपण स्वतः तयार करतो. असा "घाईघाईने-बिनबुडाचा विचार करणे" म्हणजे तो विचार दोष आहे. विचारातील बिघाड आहे. आणि असा बिघडलेला विचार घाईघाईने बिन पुराव्याचा आपण तयार करतो. त्या बिनपुराव्याच्या घाईघाईने तयार केलेल्या कारणाला देव म्हणतात. थोडक्यात देव म्हणजे घाईघाईने बिन पुराव्याचा तयार केलेला एक बिघडलेला विचार होय. म्हणूनच विचार असे बिघडत गेले की डोके अस्थिर होते आणि भ्रम तयार होतात. आणि ही भ्रमिष्ट अवस्था माणसांना कोणतीही कृती करायला भाग पाडते...ज्याला आपण कर्मकांडे म्हणतो. जी निरर्थक असतात. उदाहरणार्थ, कोव्हीड रोगासाठी एखाद्याने सांगितले अमुक एक काढा प्या तर आपण तो काढा कोणताही मागचा पुढचा विचार न करता पिऊन टाकतो. भ्रमिष्ट अवस्था ही भीती निर्माण करते आणि या भीतीतून कोणीही एखादा उपाय सांगितला तर तो पटकन केला जातो. काहीवेळा एखाद्या रोगावर आधुनिक वैद्यकामध्ये औषध नसेल तर "इतर पॅथी करून बघा" असा सल्ला एखाद्याने दिला की मग आपण त्या पॅथी कडे वळतो आणि उपाय करत सुटतो. हे भ्रमिष्ट अवस्थेत घडते. म्हणूनच... 
विचार दोष हे देवाला जन्म देतात आणि भ्रमिष्ट अवस्था कर्मकांडांना जन्म देतात ! 
थोडक्यात हे सगळे मनाचे खेळ असतात. देव आणि कर्मकांडे हे जेव्हा मनाचे खेळ आपण खेळतो तेव्हा प्रत्येकाचा देव आणि कर्मकांड वेगळे बनते. म्हणूनच हजारो देव आणि लाखो कर्मकांडे मानवी संस्कृतीत आढळून येतात. म्हणजेच मानवाच्या मनाचे खेळ हे देवाला आणि कर्मकांडांना जन्म देतात. या मनाच्या खेळात विचार दोष किंवा बिघडलेले विचार हे कारणीभूत असतात आणि ते दुरुस्त जर झाले नाहीत तर देव मानण्याची प्रक्रिया चालूच राहते. देव जर डोक्यातून काढून टाकायचा असेल तर बिघडलेला विचार दुरुस्त करणे हा त्यावरचा उपाय आहे. एक बिघडलेला विचारातला दोष आपण पाहिला. तो म्हणजे घाईघाईने निष्कर्ष काढणे किंवा इंग्रजीत त्याला जम्पिंग टू द कन्क्लूजन असे म्हणतात. हा दोष अवास्तव व चुकीचा असल्यामुळे त्याला कुतर्की किंवा ईलॉजिकल म्हणतात. किंवा सामान्य भाषेत मूर्खपणा म्हणतात. लॉजिक किंवा तर्क जेव्हा आपण वापरतो तेव्हा विचारात दोष निर्माण होत नाहीत. म्हणजेच वैचारिक शहाणपण जर असेल तर देव उरत नाही. जेव्हा असे अनेक ईलॉजिकल किंवा मूर्खपणाचे दोष आपण आपल्या विचारांमध्ये साठवतो तेव्हा हा ते विचार इरॅशनल किंवा अविवेकी बनतात. म्हणजेच ते आपणास वरचेवर अडचणीत आणतात. कारण देव हा अविवेकी विचार असल्याने आपण अज्ञात इतर कारणे शोधून काढण्याचा प्रयत्न सोडून देतो. अज्ञात कारण किंवा देव हेच सर्व विश्वाच्या चालवण्या मागे कारण आहे असे आपण डिक्लेअर केलेले असते. थोडक्यात अज्ञात कारण शोधत बसण्याचे आपण सोडून देऊन देव हेच कारण आहे असा सोपा उपाय किंवा मार्ग आपण निवडतो...
आणि आपल्या मानसिक शांततेसाठी देव हा शॉर्टकट बनतो. 
हा शॉर्टकट बिन त्रासाचा, बिन कष्टाचा आणि बिन शहाण्या विचाराचा असल्याने तो आपण मनात घट्ट करून ठेवतो. ज्यामुळे आपणास डोक्याला जास्त ताप होत नाही आणि समोर उभ्या ठाकलेल्या समस्येतून तात्पुरती आणि पटकन सुटका होते. ज्यांना डोक्याला जास्त ताप करून घ्यायचा नसतो आणि विना काबाडकष्ट कारणे पदरात पाडून घ्यायची असतात असे लोक देव हा शॉर्टकट वापरत राहतात आणि त्याची सवय झाली की मग रोज देवाचे नामस्मरण सुरू होते. देवाच्या नावाने पुटपुटलेले मंत्र, आकाशाकडे हात करून केलेला धावा, देवाच्या दारी न चुकता जाण्याची सवय, इत्यादी अनेक मार्ग लोक निवडतात. आणि स्वतःची मानसिक सुटका करून घेतात. ही सुटका तात्पुरती असते आणि कायमस्वरूपी इलाज करणारी नसते. त्यामुळे परिस्थिती जैसे थे राहते. म्हणूनच देव आणि कर्मकांडे ही शतकानुशतके जैसे थे या अवस्थेत अजूनही चालू आहेत आणि या सार्या मागे ही परिस्थिती बळकट करणारी, लोकांच्या अशा मानसिकतेचा फायदा घेणारी, पुरोहित शाही असते. आणि मग समाजात शोषण व्यवस्था निर्माण होते. 
देव हा मनाचा खेळ आहे पण हा खेळ समाजाला दैववादी आणि डबक्यातला असा स्थितिशील बनवतो. देव नावाचा बिघडलेला विचार दुरुस्त करण्यासाठी विज्ञानाने आता मानस विज्ञान तयार केलेले आहे ज्यामध्ये विवेक उपचार हा महत्त्वाचा ठरत आहे. हा विवेक उपचार किंवा रॅशनल बिहेवियर थेरपी प्रत्येकाने अमलात आणली पाहिजे नाहीतर देवाचा गजर पुढे ही अखंड घुमत राहील !!!
- डाॅ. प्रदीप पाटील

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार