पाऊस कोपलाय
लोक म्हणताहेत पाऊस कोपलाय वर्षाची सरासरी अवघ्या काही दिवसांत गाठत तो वेड्यासारखा कोसळतोय. असं काही नाही. त्याचं कुठं काय चुकलंय ? पूर्वी तो वेळेवर न चुकता जूनच्या पहिल्या आठवड्यात यायचा आणि सप्टेंबर अखेर पर्यंत दमादमाने आस्ते कदम बरसत राहायचा. शाळेच्या सुरुवातीला पोराठोरांसंगे दंगा करायचा, ज्येष्ठात तांबड्या मातीतल्या भातशेतीतून लोळण घेत शिवारभर फिरून दमल्यावर कौलारू घरांवरून घसरगुंडी खेळायचा आषाढात वारकऱ्यांच्या पायात घुटमळत दिवेघाटातून दरवळत राज्यभरात घुमायचा, काळ्या मातीत पेरलेल्या बीजांना गोंजारायचा. आभाळमाया करायचा, सह्यकड्यापासून सातपुड्यापर्यंत डोंगररांगांवर अभिषेक करायचा वसिष्ठीला वंदन करुन तापीच्या पायावर लीन व्हायचा, त्याचा हा प्रवास ठरलेला असायचा... वाटेतल्या बांधांबांधांवर वडिलकीच्या मायेने हात फिरवायचा, एखाद्या चंद्रमौळी झोपडीत वाकून बघताना गहिवरून यायचा, ओल्या बाळंतीणीच्या अंधारल्या खोलीत डोकावून पाहताना बाळाच्या मखमली पायाला गुदगुल्या करायचा गावागावातल्या मंदिरांची शिखरे अन मस्जिदींचे मीनार स्वच्छ धुवून काढायचा वेशीवरच्या जीर्ण पिंपळाला आलिंगन द्यायचा, पारावरच्या वट...