उपदेश करू नकोस

*१०१ नंबरचा कौरव*



मी माझ्या स्वत:च्या केलेल्या आत्म परीक्षणावरून असे नक्की सांगू शकतो कि, मी जर महाभारत काळात जन्माला आलो असतो तर माझा समावेश कौरवांच्या पार्टीतच झाला असता.

श्रीकृष्ण मला कधी प्रत्यक्षात गाठ पडला मी त्याला एकमेव प्रश्न हा विचारेन कि ...

” देवाधिदेवा... भगवतगीता अर्जुनाला सांगण्याऐवजी , दुर्योधनाला आणि दु:शासनाला सांगितली  असती तर हे महाविनाशी युध्द टाळता आले असते ना ? इतका मोठा संहार झाला नसता. तू असे का केले नाहीस ? भगवतगीतेचे  हे दिव्य ज्ञान कौरवांना झाले असते तर महाभारत हे युद्धाच्या तत्त्वज्ञानाऐवजी  बंधुभावाच्या, प्रेमाच्या तत्त्वज्ञानाची शिकवण देणारे झाले नसते का ?”

सध्यातरी कृष्णाने प्रत्यक्ष दर्शन देणे शक्य नव्हते. त्यामुळे सर्व ब्रह्मांड सामावलेल्या कृष्णाच्या मुखाइतकेच विशालकाय माहितीच्या ब्रम्हांडात , म्हणजेच इंटरनेटच्या जंजाळात मी हा प्रश्न प्रसूत केला. बघताबघता हा प्रश्न प्रचंड व्हायरल झाला. फेसबुक, whatsapp, quora, reditt , युट्युब सगळीकडे या प्रश्नाने धुमाकूळ घातला. आणि अखेरीस इतके ट्रॅफिक ओसंड्ल्यामुळे प्रत्यक्ष श्रीकृष्णाला त्याची दखल घ्यावी लागली. 

आणि एके दिवशी मला श्रीकृष्णाचा video कॉल आला. 

अक्षयकुमार आणि परेश रावलचा OMG बघितलेला असल्यामुळे  , श्रीकृष्ण अगदी साध्या वेशभूषेत येणार हे मला अगोदरच ठाऊक होते. 

थेट स्वर्गातून , पृथ्वीवर कॉल लावलेला असल्यामुळे , खुप डेटा खर्च होत असणार, त्यामुळे श्रीकृष्णाने थेट मुद्द्याला हात घातला .

“ वत्सा , कशाला इतके अवघड प्रश्न नेटवर टाकतोस ? सगळे ट्रॅफिक जाम झाले आहे”

“ देवा , हा आखिल मानवजातीच्या मार्गदर्शक धर्मग्रंथाचा प्रश्न आहे. तुमच्या आणि अर्जुनाच्या दरम्यान झालेली प्रश्नोत्तरे , संवाद म्हणजे संपूर्ण मानवाची आदर्श भगवतगीता आहे. तुम्ही हे युद्ध टाळण्यासाठी हे ज्ञान कौरवांना दिले असते तर भगवतगीता अस्तित्वातच आली नसती .......मग मानवाचे कल्याण कसे झाले असते ? हा प्रश्न इंटरनेटच्या  ट्रॅफिकपेक्षा कितीतरी महत्वाचा नाही का ?”

“ मला उपदेश करू नकोस ”............... श्रीकृष्णाला एकदम बदललेला स्वर ऐकून मी भांबावलो.

“ देवा , माझी काय बिशाद तुम्हाला उपदेश करण्याची “ ....मी गयावया केली.

“ वत्सा ...अरे तुला नाही म्हणालो.”........मला हायसे वाटले. श्रीकृष्ण बहुतेक इअरफोन ब्ल्यूटूथ द्वारे दुसऱ्या कुणाशी तरी बोलत असावेत , अशी मला शंका आली. पण श्रीकृष्ण माझ्याशीच बोलत होते.

“ मला उपदेश करू नका ...असे दुर्योधन मला म्हणाला होता , तुला काय वाटते ? मी हे युध्द टाळण्यासाठी मी दुर्योधनाकडे गेलो नसेन ? भगवतगीतेमधील न्याय अन्याय , नैतिकतेच्या गोष्टी त्याला सांगितल्या नसतील ?”

“ काय सांगताय देवा ? दुर्योधनाला प्रत्यक्ष तुम्ही गीतेचे ज्ञान सांगून देखील त्याला ते कळाले नाही ? तो सरळसरळ तुम्हाला उपदेश वगैरे करू नका म्हणाला ?”

“ वत्सा , अगदी असेच घडले बघ. दुर्योधन म्हणाला .....मला चांगले वाईट, पाप पुण्य, नैतिक अनैतिक या सगळ्याचे ज्ञान आहे. सदवर्तन आणी दुवर्तन यातील फरकही मी जाणतो , त्याचा उपदेश मला करू नका “. 

“ देवा ...हे पहिल्यांदाच ऐकतोय. दुर्योधनाला ज्ञान होते. तू देखील त्याला मानवी मुल्यांची भगवतगीता सांगितली होतीस , तरीही त्याने हेका सोडला नाही ! त्याचा नक्की प्रॉब्लेम तरी काय होता ?”

“ वत्सा , हाच नेमका प्रश्न मी दुर्योधनाला विचारला होता आणी याचे उत्तरही दुर्योधनानेच मला दिले होते “.

“देवा, मला सांगा ते उत्तर ....मी जाणून घेण्यास उत्सुक आहे.” 

“ वत्सा , ते उत्तर तुला चांगलेच ठावूक आहे, सर्व मानवजातीला ठावूक आहे. पाप काय आहे हे दुर्योधन आणि तुम्ही जाणता पण त्यापासून दूर रहाणे तुम्हाला जमत नाही. अनैतिकता म्हणजे काय हे दुर्योधन आणि तुम्ही ओळखता , पण ती कटाक्षाने टाळणे, तुम्ही करीत नाही. तुमच्यासाठी चांगले काय आहे आणि वाईट काय आहे हे तुम्ही जाणता , पण तुम्ही वाईटाचीच निवड करता. दुर्योधनाने स्वत:च्या वर्तनाची अगतिकता सांगून जबाबदारी नाकारली , त्याने स्वत:चा नाकर्तेपणा ढालीसारखा वापरला”.

मला दुर्योधनाच्या जागी माझा चेहरा दिसायला लागला .

“मला उपदेश करू नका “......वडिलांना उद्देशून हे वाक्य मी शंभरवेळा उच्चारले असेन. मित्रांबरोबर उनाडक्या करणे , चुकीचे होते हे मला माहिती होते, पण मी त्याचीच निवड करीत होतो. आणि वडिलांना “उपदेश करू नका” असे सांगत होतो. 

सकाळी लवकर उठून व्यायामाला जाणे माझ्या फायद्याचे होते हे मला ठावूक होते. पण अंथरुणात लोळत पडणे हे माझे वर्तन होते, आणी “लवकर उठत जा” असे सांगणाऱ्या  आईला “उपदेश करू नकोस” असे सांगणारा दुर्योधन मीच होतो.

“तंबाखू खाऊ नका , दारू पिऊ नका , मांसाहार करू नका “ हे उपदेश आम्हाला ऐकायचे नाहीत. त्यामुळे शरीराचे नुकसान होते हे आम्हाला ठावूक आहे. पण त्याची अंमलबजावणी आम्हाला करायची नाही . कारण आम्ही दुर्योधन आहोत. आम्ही कौरव आहोत.

अर्जुन आणि दुर्योधनात हा फरक होता कि , दुर्योधनाने स्वत:च्या वर्तनासमोर शरणागती पत्करली होती आणी अर्जुनाने स्वत:चे वर्तन कसे मर्यादेत ठेवायचे हे शिकण्यासाठी श्रीकृष्णाला प्रश्न विचारले होते.

श्रीकृष्णाने सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. 

संस्कार, प्रकृती, राग, श्रेय, प्रिय, प्रतिक्रिया, कर्म, विषय ....याबद्दलच्या संकल्पना जाणून घ्या .

कधीतरी स्वत:ला प्रश्न विचारा, श्रीकृष्णाला प्रश्न विचारा ......तरच भगवतगीता वाचण्याची इच्छा होईल.


*जंहा आंख खुली,वंहीसे सवेरा शुरु होता है!...गुमराह मधील सर्वात शेवटच वाक्य!*

*सध्यातरी माझा कौरव नंबर १०१*

 *आहे .......तुमचा ?*

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार