आपली कालकुपी केली का?

आपली कालकुपी केली का?

परवा मला एक फोन आला. त्या व्यक्तीने सांगितले, ‘सर आपले विमा एजंट श्री रवींद्र  यांचे ३ दिवसांपूर्वी अचानक हृदयविकाराने निधन झाले आहे. मी तुम्हाला फोन केला कारण त्यांच्या डायरीत तुमचे नाव आहे आणि आपला मेडिक्लेम हप्ता येत्या १२ तारखेस ड्यू आहे. आपण चेक तयार ठेवा मी आज येऊन चेक कलेक्ट करतो. म्हणजे तारीख उलटणार नाही. मी त्यांचा मेव्हणा बोलतोय.’ मला मेव्हण्याचे कौतुक वाटले व्यक्ती जाऊन ३ दिवस झाले होते. अशा परिस्थतीत रवींद्रची डायरी उघडून मला फोन करून तारीख उलटणार नाही याची काळजी घेतली. मला त्यांनी सांगितले, ‘माझी बहिण आता एजंट म्हणून काम करणार आहे तुम्ही काळजी करू नका. मी तिला मदत करणार आहे. तुमच्या सारखे अनेकांच्या विमा तारखा या महिन्यात ड्यू आहेत. त्यांना contact करतोय.’ मी दु:ख व्यक्त केले. थोड्या माझ्या आठवणी त्यांच्याशी शेअर केल्या. माझे विमा व्यवहार तुमच्याबरोबरच रहातील असे आश्वासन दिले. वयाच्या ४३व्या वर्षी अचानक रवींद्रने एक्झिट घेतली. दु:खातून सावरून व्यवहारिक जगात येणाऱ्या त्या बहिण भावाचे मला कौतुक वाटले. कै. रवींद्र आपली कालकुपी डायरी स्वरुपात लिहित होते म्हणून आज त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीचे आणि माझ्यासारख्या क्लाएंटचे आयुष्य सुकर झाले. किती महत्वाचे काम कै. रवींद्र करून गेले. बऱ्याचदा असे म्हणले जाते जाणारा जातो आणि मागे रहाणाऱ्यांना भोगावे लागतं. पण रवींद्रने तसे होऊ दिले नाही. त्याने कालकुपी तयार ठेवली होती. त्याची पत्नी आणि मेव्हणा यांनी show must go on  हे वेळेत ठरवल्यामुळे माझ्यासारख्या अनेकजणांचा त्रास वाचणार होता. धन्यवाद रवींद्र ऐकायला तो या जगात नव्हता. पण त्याचे हे अनेकांवर उपकार होते त्याने डायरी ठेवली.

पूर्वी घरातले वडील माणूस गेले की साधारण १३ दिवस झाले की सगळे एकत्र बसून त्यांची कागदपत्रे असणारा कप्पा, कपाट वा ट्रँक उघडून भावंडे बसत. एकेक कागद शोधला की काही पासबुक, FDच्या पावत्या, शेअर्स सापडत. यांची यादी केली त्या त्या बँकेत जाऊन डेथ सर्टिफिकेट द्यायचे आणि वारसांच्या नावावर असेट ट्रान्सफर करायची. सोपं होतं सगळं. आता ऑनलाइन बँकिंग आलंय. पासबुक बहुतेक वेळा नसतेच. वारसांना आपल्या आई वडिलांचे खाते कुठे आहे काही माहीत असण्याची शक्यताच नसते. आपण स्वतःच आपला आयडी / पासवर्ड विसरलेलो असतो. तर इतरांना काय सांगणार? id password शोधणे त्या software सिक्युरिटीच्या जंजाळातून शोधणे अवघड होऊन बसते.  बऱ्याच अकाउंटची स्टेटमेंट इमेलवर येतात. गेलेल्या व्यक्तीचा इमेल पासवर्ड नसेल तर, किती आणि कोणती स्टेटमेंट येतात ते कळणार कसे? किती अकाउंट्स आहेत, कोणत्या बँकेत आहेत, किती रक्कम आहे, नॉमिनेशन आहे का नाही. काही म्हणजे काही कळत नाही. शेअर्स, म्युच्युअल फंडस, बॉण्ड्स तर डिमॅट account वर जमा असतात. किती जणांना आपल्या प्रिय व्यक्तीचे डिमॅट नंबर माहीत असतात? काहींनी जमिनीचे व्यवहार अर्धवट करून ठेवलेले असतात. अर्धवट रकमा दिलेल्या असतात. व्यवहार पूर्ण झालेला नसतो. कुठेही रक्कम काय कारणाने दिली याची नोंद केलेली नसते. अशावेळी काय होणार? नव्या बँकिंग आणि डिमॅट व्यवस्थेशी जमवून घेताना आपली अकाउंट्स त्याचे आयडी आणि पासवर्ड वेळोवेळी लिहून ठेवणे आवश्यक आहे. पण वेळोवेळी बदललेले पासवर्ड लिहून ठेवण्याचा कंटाळा येतो. आज विचार केला तर इमेलपासून डीमॅट पर्यंत एका माणसाला कमीत कमी २०-२५ युजर id आणि password लक्षात ठेवावे लागतात. तुम्ही एक लक्षात ठेवाल. पण तुमच्या पश्चात?  कोणतीच गोष्ट लिखित स्वरूपात नसल्याने पैसे वारसांना मिळण्यास प्रचंड अडचणी येऊ शकतात. आपली प्रिय व्यक्तीचे एखादे खाते आहे हे माहीतच झाले नाही तर वारसाला आपले खाते माहितच नाही पैसे मिळणार कसे? मधून मधून अशा बातम्या येतच असतात. LIC वा ppf वा बँकांकडे  uncleaimed लाखो कोटी रुपये पडून आहेत. या साठी आपली कालकुपी तयार करून कायम कायम तयार आणि अप टू ठेवायला हवी. कालकुपीत आपले आर्थिक व्यवहार, बँकेचे व्यवहार, शेअर्स आणि म्युच्युअल फंडस यांची माहिती वेळोवेळी अपडेट ठेवावी. हल्ली नेटफ्लीक्स सारखे subscription अकौंटमधून ऑटोडेबिट केले जाते. व्यक्ती गेली तरी हे subscription खात्यातून balance असेल तर डेबिट चालूच रहाते. म्युच्युअल फंडाचे SIP डेबिट हे देखील असेच. जर वारसांना माहित नसेल हे थांबणार कसे? क्रेडीट डेबिट कार्डांचा व्यवहार कसा बघणार? कालकुपी हे त्यावरचे उत्तर आहे. बऱ्याचदा घरचे कर्त्या स्त्री-पुरुषांच्या ह्या व्यवहाराबद्दल अनभिज्ञ असतात. मला काय त्यातलं समजतंय? दुर्लक्ष करण्यासाठीचे हे मुख्य कारण. त्यांची परिस्थिती आणखीनच कठीण होऊन बसते.   

वर जे उदाहरण दिले आहे. त्या प्रमाणे जाणाऱ्या व्यक्तीचे काही व्यवहारातून पैसे येणे/देणे असते. काही लोकांचे व्यवहार ती व्यक्ती बघत असते. उदा. एखाद्या सेल्स इंजिनिअरने कंपनीचे चेक गोळा केलेले आहेत पण त्याचे दुर्दैवाने निधन झाले तर गोळा केलेले चेक कुठे ठेवतात हे कुटुंबियांना माहित असेल तर कंपनीत ते पोचवू शकतात. अनेक लोकांचे पगार त्यावर अवलंबून असतात. माझ्या एका मित्राचे वडिलांनी एका केमिकल productचा फॉर्म्युला शोधला. प्रिंटींग क्षेत्रात अतिशय उपयोगी ठरेल असे product होते. त्यांनी ते product बनवण्याची प्रोसेस आणि फॉर्म्युला व्यवस्थित डॉक्युमेंट केला. दुर्दैवाने ते गेले. मुलाने एक दिवस सहज त्यांची डायरी बघितली. product बनवण्याची इत्थंभूत माहिती. हा मित्र केमिस्ट नव्हता पण उत्तम मार्केटिंग करू शके. त्याने डायरी आधारे ट्रायल सुरु केल्या. product बनवले आणि वाईला MIDCमध्ये जागा घेऊन प्लांट टाकला. वडिलांनी आपल्या पश्चात मित्राला intelectual  property अगदी सहज दिली होती. हे शक्य झाले वडिलांच्या कालकुपीमुळे.  

जसे आर्थिक व्यवहार या कालकुपीत ठेवणे अनिवार्य आहे तशा कालकुपित अनेक गोष्टी ठेवता येईल. हल्ली सोशल मिडिया मुळे घराघरात संवाद कमी झालाय. पूर्वी जे बाहेर घडले ते घरात बोलले जात असे. व्यवहार आणि संवाद पारदर्शी असत. जास्त कॉम्प्लेक्स नसत. सरळ सोपे व्यवहार.  आता बाहेरचे आणि घरातले असे दोन एकमेकांना न दिसणारे मध्ये अभेद्य भिंती असणारे कप्पे असतात. व्यावहारिक जगात व्यवसायाच्या जागी वा नोकरीच्या जागी अनेक भल्या-बुऱ्या घटना घडत असतात. अनेकदा आपण आपला व्यवसाय करताना अडचणीत आलेलो असतो, कामाच्या जागी कठीण प्रसंग आलेला असतो. अनेक दिवस एकाकी लढाई दिलेली असते. मनस्ताप भोगलेला असतो. यातील काही प्रसंग निपटायला अनेक महिने वा वर्षे लागली असतात. एखादी तांत्रिक समस्या खूप दिवसांच्या प्रयत्नाने सुटते.  एखाद्या व्यावसायिकाच्या व्यवसायातून पार्टनर बाहेर पडला अथवा त्याचा मृत्यू झाला तर प्रचंड मनस्तापाला अनेक महिने सामोरे जावे लागते. एखादी इन्कमटॅक्स वा कराची नोटीस आली तर आपले म्हणणे योग्य आहे हे पटवण्यासाठी अनेक खेपा घालाव्या लागतात, कुणी एखादा कस्टमर पैसे बुडवतो, कामगार समस्या उद्भवते,  एक ना अनेक समस्या व्यवसायात येतात. यातल्या काही आपण घरी बोलत नाही. त्यातून सहचारी वा सहचारिणी देखील तिच्या/त्याच्या समस्यांना तोंड देत असते. तिला कशाला त्रास ही न सांगण्यामागची भावना असू शकते. मुले लहानच असतात त्यांना काय कळते म्हणून त्यांना अंधारात ठेवले जाते. तरुण वयात काही व्याधी वा आजारपण निभवायची वेळ आलेली असते. त्यातून उद्भवणाऱ्या आर्थिक, शारिरीक, मानसिक समस्येला आपण तोंड दिलेले असते. मुलांना या आजारातून आणि परिणामातून कसे निभावलो हे माहित नसते. हे कसे घडले हे कालकुपीत लिहून ठेवावे. आपल्या मुलांना मुलींना आपण फक्त केवळ कर्ते म्हणून माहीत असतो. आपण बऱ्याचश्या समस्यांना कसे तोंड दिले याची त्यांना कल्पनाच नसते. आपल्या विषयीचे अनेक पूर्वग्रह घेऊन मुलं वाढत असतात. यातील काही पूर्वग्रह आपल्या वर्तणुकीतून घेतात, कधी मुलांवर राग काढलेला असतो आणि काही जवळच्या व्यक्तीने करून दिलेले असतात. अगदी आई देखील वडिलांविषयी मुलांच्या मनात ग्रह करून देते. आपले अंतस्थ खरे स्वरूप त्यांच्यापासून अंधारातच राहिलेले असते. आपले आई/वडील कायम कामात व्यग्र असतात, त्यांचा स्वभाव करडा आहे, त्यांच्याशी बोलण्यात अर्थ नाही. अशी देखील काही मुलांची धारणा होऊन बसते. एक ना अनेक समज गैरसमज आपलीच मुलेच बाळगून असतात. शिवाय त्यांच्या त्यांच्या काही समस्या असतात त्याकडे आपण व्यावसायिक कार्यबाहुल्यामुळे दुर्लक्ष केलेले असते. ती खंत मुलांमध्ये खदखदत असते. दोन्ही बाजूने या खदखदीचे निराकरण झालेलं नसते. बऱ्याचदा हिरक महोत्सव, अमृतमहोत्सव वा सहस्रचंद्रदर्शन अशा कार्यक्रमात त्रोटकपणे आठवणी जागवल्या जातात पण केवळ कौतुक म्हणून. त्या जर लिखित असतील पुढच्या पिढीला एक ऐवज मिळेल. कठीण समस्येतून बाहेर पडणे हा मोठा अनुभव ऐवज आहे. पुढची पिढी प्रसंगी त्यातून प्रेरणा घेतील किंवा कमीतकमी आपल्याविषयीचे मनात असलेले समज गैरसमज दूर करतील. कायम बुरे अनुभव येतात असे नाही. अनेक चांगल्या गोष्टी घडतात. उदा. एखादी मोठी ऑर्डर कस्टमर विश्वास ठेऊन देतो आणि तुम्ही ती उत्तमरीत्या पार पाडता आणि त्यांचे व्यावहारिक नाते कायमचे सुरु होते. त्यातून आर्थिक उत्पन्नाचा स्रोत सुरु होतो. या उत्पन्नातून सर्व कुटुंबाला आपण सुखी समाधानी जीवन देत असतो. एखाद्या तांत्रिक समस्येवर आपण उत्तम आणि कमी खर्चात तोडगा काढता. एखादे इनोवेशन घडवून आणता. हे सगळे या कालकुपीत नोंदवा. प्रत्येक प्रेरणा काही लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, रतन टाटा, बिल गेट्स, स्टीव जॉब्सकडूनच घेतली पाहिजे असे नाही. आपल्या आई-वडिलांकडून, आजी-आजोबाकडून, पणजी-पणजोबाकडून किंवा आजूबाजूच्या जवळच्या नातेवायकाकडून देखील मिळू शकते आणि ती जास्त जवळची वाटू शकते. जास्त practical असू शकते. आपल्या जीवनाच्या जवळची असू शकते. अभिमान देणारी असू शकते.

कालकुपी कुणी करावी याला वयाचे बंधन नसावे. काळ तरुण वयात देखील झडप घालू शकतो. जसे कै रवींद्रचे झाले. कालकुपी पुरुषांनीच करावी असे नाही. स्त्रिया देखील कर्तृत्व गाजवू लागल्या त्याला देखील अनेक वर्षे लोटली. इन फॅक्ट स्त्रियांकडे कालकुपीत ठेवण्यासारखे जास्त मटेरियल असते. नाही का? मुद्दा कालकुपी हार्ड आणि soft दोन्ही स्वरुपात ठेवावी. आर्थिक व्यवहाराचे id आणि password हार्ड स्वरुपात ठेवावे. आठवणींचा ब्लॉग करावा अथवा लिखित करावे. पण कालकुपी जरूर करावी.

मध्ये मी एक प्रयोग केला. १९९५ ते २००३ घरात एकापाठोपाठ आजारपण सुरु झाले. हा एकंदर कालावधी सलग ७-८ वर्षांचा होता. योगायोगाने हा साडेसातीचा काळ होता. (मी विश्वास ठेवत नाही बरंका!) नुकतीच पार्टनरशीप तुटलेली, औषधोपचार सुरूच होते, खर्चाला सीमा नव्हती आणि व्यवसाय चालूच होता. २०-२५ एम्प्लॉयी होते. अवघड असा कालखंड. त्या वेळी मुले तेव्हा लहान होती. मी जसा भोगला, निभावला तसा लिहून काढला. ३० पाने झाली.  पण आता जाणती झाली आहेत. त्यांना वाचायला दिला. २-३ दिवस माझ्याशी कुणी बोलेना. अर्थात हे न बोलणे त्यांनी जे वाचले त्यावर दिलेली अबोल प्रतिक्रिया होती. त्यांचे चेहरे बोलत होते. बाबा तुम्ही ग्रेट आहात. हेच जर मी जरा जवळ बसा माझी कहाणी सांगतो तर कुणी बसले नसते आणि वेळ काढून ऐकून घेतले असते. एक काळ असा होता मी माझ्या आजीच्या आजोबांच्या जवळ बसून त्यांच्या आयुष्यातल्या घटना गोष्टीसारख्या ऐकल्या. आजी तर तिचे अनुभव प्रसंगी दाखल्यांसाठी जागोजागी देई. मला ते अनुभव ऐकायला आवडत.  अर्थात तो काळ असा होता TV, इंटरनेट सारखी चित्त विचलित करणारी साधने नव्हती. श्रवण हे मुख्य करमणुकीचे ज्ञानार्जनाचे साधन होते. आता वेळ नाही. म्हणून डॉक्युमेंट करयचे. बकेट लिस्ट जिवित असतना, तशी ही कालकुपी आपल्या पश्चात आपल्या प्रियजनांसाठी आणि हो या कालकुपीत आपल्या मृत्यूपत्राचा अंतर्भाव हवाच. आपल्या भावी पिढीचे आयुष्य त्याने सुकर होणार आहे.

श्रीकांत कुलकर्णी

९८५००३५०३७


--
Shrikant Kulkarni
9850035037

Click on my Blog

http://shrikaant.blogspot.com/

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार