माणसांवरचा विश्वास
ज्यांच्याबद्दल अतोनात विश्वास असतो, ती माणसं कधीकधी इतकी धक्कादायक वागतात की त्या धक्क्याने आपण कोसळून जाऊ असं वाटू लागतं. जवळच्या माणसांनी केलेले विश्वासघात फार जिव्हारी लागणारे असतात. त्यामुळे लौकिक अर्थाने आपलं फारसं नुकसान झालेलं नसलं तरी भावनिक पातळीवर कधीही न भरून निघणारी हानी झालेली असते. माणसांवरचा विश्वास उडू लागतो अशाने....फार हट्ट करावासा वाटत नाही मग कशाहीसाठी आणि कोणाहीसाठी. अर्थात या पासिंग फेजेस असतात. त्या येतात आणि पुरेशी वेदना सोसून झाल्यावर जातातही. आपण आपल्या मूळ स्वभावावर येतोच पुनःपुन्हा! पण तरीही, फार जवळून अनुभवलं की प्रत्येकाचेच पाय मातीचे आहेत हे दिसू लागतं. मग आपण उदास होऊ लागतो. एवढ्यातेवढ्याने भारावून जाण्याचा आपला स्वभाव असू नये आणि कोणालाही पराकोटीचा आदर्श मानून बसू नये. माणसं म्हटली की वर्तनात कमी जास्त गोष्टी व्हायच्याच आणि ते अगदी नैसर्गिक आहे.माणसांतली नाती पूर्णतः नि:स्वार्थ कधीही नसतात, आणि त्यात वावगंही काही नाही, हे आपण लक्षात ठेवायला हवं. म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःख वाट्याला येत नाही. प्रत्येक मानवी...