साठी कोणा साठी

*साठी कोणा साठी?*

आयुष्याच्या डोंगरमाथ्यावरून खाली उतरायला सुरुवात झाली की पहिला टप्पा लागतो साठीचा! 
साठी सुरू झाली की शांतीपाठ करतात, "साठी बुद्धी नाठी" अश्या म्हणीपण प्रचलित आहेत....

असे काय होते नेमके साठी सुरू झाल्यावर ज्यासाठी हे सगळे? सांगू?.....

साठी म्हणजे मोठे संक्रमण असते. आणि ते सोपे नसते! मध्यान्हीचा सूर्य मावळतीकडे जायला लागल्यावर जश्या सावल्या लांब जाऊ लागतात तसेच साठीचे असते.वयाच्या विशीत ज्या नोकरीची/कामाची सुरुवात केली त्याला पूर्णविराम देऊन आयुष्याच्या पूर्णविरामाकडे वाटचाल सुरू करण्याचा पहिला टप्पा म्हणजे साठी!

साठी म्हणजे निवृत्तीची सुरुवात असते. साधारणपणे या वयात येईपर्यंत मुले मोठी होऊन- नोकरी लग्न संसार या टप्प्यावर पोचलेली असतात.नातवंडे देखील आलेली किंवा येऊ घातलेली असतात. कालपरवापर्यंत काका काकू मावशी असणारे आपण अचानक आजी आजोबा श्रेणीत पोचतो! नाही म्हणले तरी त्याचा थोडा धक्का बसतोच! साठी एकदम ज्येष्ठ नागरिक श्रेणीत पोहोचवते! 
नाही, म्हणजे पिकलेले केस, टक्कल, सुरकुत्या यांनी रूपावर आक्रमण केलेले असतेच पन्नाशी पासून! 
पण आता जोडीला BP Sugar Cholesterol thyroid संधिवात हेपण काहीवेळा "वात" आणायला लागतात!

कलकलाट गोंगाट नको वाटायला लागतो.अचानक नवी गाणी कर्कश्श वाटू लागतात. नवीन हिरो हिरॉईन ओळखू येईनासे होतात. 
घराला कुलूप लावून बाहेर पडले की गॅस बंद केला होता ना, कुलूप नीट लागले ना अश्या शंका यायला लागतात. हवी तेव्हा हवी तेवढी झोप येतेच असे नाही. बहुतेक वेळा ती नको तेव्हा येते आणि हवी तेव्हा येत नाही. सकाळी निवांत उठायचे असे ठरवून देखील हमखास लवकर जाग येते.आधीसारखी चपळाईने कामे होत नाहीत. शाळेत असताना जशी शिस्त पाळावी लागायची तशी आता पथ्य पाळावी लागतात! आवडलेल्या जिलेबीच्या आग्रहाला निग्रहाने नाही म्हणावे लागते. 

ऑफिस मधले आपले डेस्क दुसऱ्या कोणासाठी तरी रिकामे करावे लागलेले असते.ते रिकामपण फक्त डेस्कपुरते नसून आयुष्यात उतरलय हे पचवणे सोपे नसते.अचानक आयुष्यातली धावपळ गडबड संपते. मुख्य म्हणजे ऑफिसमध्ये काय किंवा मुलांचे काय आपल्यावाचून अडणार नाही हे समजून घेणे सोपे नसते! 

गृहिणींना पण अचानक घरात फक्त दोघांचा स्वयंपाक करावा लागणार आहे ही कल्पना रुचत नाही! मुलांच्या किलबिलाटाने भरलेल्या घरात आता नीरव शांतता असते. सकाळी एकदा आवरा आवरी झाली की पुन्हा वर्तमानपत्राचीसुद्धा घडी विस्कटत नाही.
कालपरवापर्यंत आपल्याकडे पैसे मागणारी मुले अचानक,"आईबाबा काही लागले तर सांगा "असे म्हणतात तेव्हा कळते की आता आपला उमेदीचा काळ संपला.आता आलेलं रिकामेपण घालवायला नवी उमेद आणायला हवी.

आपण जन्मभर ज्या मुलांच्या मागे धावलो ती आपापल्या मार्गानी उडून गेलेली असतात. मग असे वाटायला लागते संसारासाठी, मुलांसाठी जगता जगता स्वतः "साठी" जगायचे राहूनच गेले! पण हे जाणवेपर्यंत "साठी" उजाडलेली असते. 

जोडीदाराचा हात धरून रुपेरी वाळूतून फिरायचे दिवस जाऊन वाळूची ती रुपेरी छटा केसांना कधी आली ते कळतच नाही! 

आयुष्यात कधी ना कधी असा न संपणारा रिकामा वेळ येणार आहे याचा आधी फारसा विचारच कधी केला गेला नसेल तर मोठा प्रश्न असतो की करायचे काय? त्याची उत्तरे हळूहळू मिळवावी लागतात. त्यासाठी आधीपासूनच तयारी करून काही छंद जोपासले असतील तर ते काम सोपे जाते.
 प्रापंचिक जबाबदाऱ्या  संपत आलेल्या असतात. 

लग्नानेसुद्धा चाळीशी गाठलेली असते!
जोडीदाराबरोबरचे जगायचे राहून गेलेले क्षण जगायची ही वेळ असते!जोडीने सकाळच्या चहा नाश्त्यापासून परदेशवाऱ्यांपर्यंत सगळीकडे एकत्र राहायची हीच ती संधी! आयुष्यभर ज्या जोडीदाराने साथ दिली त्याला साथ देण्याची ही वेळ!कारण आता आयुष्याची संध्याकाळ झालेली असते! ही कातरवेळ साधायची असते!!आपल्या सावल्या आपल्याला सोडून जाण्याआधी जगण्यासाठी- स्वतः"साठी"आणि जोडीदारा"साठी"ही!! ‎
*मुलानो जरूर वाचा*
*आपल्या पालकानां वेळ द्या*
 ‎ ‎👏🏼- विनया रायदुर्ग ©
 ‎
हा आणि इतर लेख खालील ब्लॉगवर उपलब्ध. 

https://vinayarayadurg.wordpress.com/2017/10/11/साठी-कोणा-साठी
 ‎☝

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार