पूर्ण लॉक डाऊन
भारताने एकवीस दिवसाचा पूर्ण लॉक डाऊन घोषित केला, आणि तो निर्णय ऐकताना का कुणास ठाऊक डोळे उगीच भरून आले...या विचाराने की प्रशासनासाठी हा निर्णय किती प्रचंड अवघड असेल. तो घेताना किती प्रचंड तणावाचा सामना करावा लागला असेल. हा निर्णय घेतला तर अर्थव्यवस्था कोसळणार...आणि न घ्यावा तर आरोग्यव्यवस्था कोसळणार आणि लाखो जीव जाणार. इकडे आड आणि तिकडे विहीर! जिथं रोज नाष्टयाला काय करायचं आणि जेवायला काय असले निर्णय घेता घेता नाकात दम येतो आमच्या, तिथं हा निर्णय घेणं किती अवघड असेल!
एकीकडे भांडवलशाही अमेरिकेचे ट्रम्प सांगतायत की अमेरिका हा देश काही लॉकडाऊन करण्यासाठी जन्माला आलेला नाही. माझ्या लोकानी लवकरात लवकर कामावर परत जायला हवं..तिथे आपला देश मात्र समजूतदारपणे अर्थव्यवस्था चार पावलं मागे गेली तरी चालेल, आमची माणसं आधी वाचली पाहिजेत असा निर्णय घेतो! कुठलाच देश लॉकडाऊनसाठी नसतो हो जन्माला आलेला. पण अवघड परिस्थितीत अवघड निर्णय घ्यावे लागतात.
जगातले इटली आणि स्पेनसारखे देश गाफील राह्यले तर काय झालं त्यातुन धडे शिकत, साउथ कोरिया सारखा देश विजयी झाला तर त्यांनी नक्की काय उपाय योजले याकडे लक्ष देत, आपल्या देशात लोकशाही आहे, चीन सारखी जबरदस्ती आपल्याला करता येणार नाही याचं भान ठेवत, सार्वजनिक आरोग्य या विषयात असलेल्या आपल्या देशाच्या मर्यादा काय आहेत याचा विचार करत घेतलेला निर्णय आहे हा. आणि अतिशय योग्य वेळी घेतलेला.
इंग्लंडसारख्या देशाने हा देश भरपूर श्रीमंत असतानाही, विकासीत असतानाही या रोगाकडे कानाडोळा केला. आणि तरी तिथला अर्थतज्ञ ओनील म्हणाला, ' बरं झालं हा रोग भारता- बिरता सारख्या देशात जन्माला आला नाही' केवढी दर्पोक्ती ही! हे लिहीत असताना मला 1990-२००० या दशकात आफ्रिकेत आलेल्या एड्सच्या साथीची आठवण येतेय. अमेरिकी औषध कंपन्यांनी बनवलेली औषधं त्यांना आफ्रिकन देशाना द्यायची नव्हती. आणि त्याचं एक कारण काय होतं? तर ही औषधं दर चार चार तासांनी घ्यावी लागतात.
आफ्रिकेतल्या अडाणी लोकांना जमेल का ती नियमितपणे घ्यायला? घड्याळे तरी असतात का त्यांच्या कडे वेळ पाहायला. या गरीब अडण्याना काही औषध वेळच्यावेळी घ्यायला जमणार नाही, मग हा व्हायरस म्युटेट होईल आणि हा नवा व्हायरस अमेरिकेत येऊन आम्हाला मारेल' असं अमेरिकेतले तज्ञ म्हणत होते. तेंव्हा भारताच्या प्रयत्नांमुळे आफ्रिकेला स्वस्त औषध मिळाली. आणि पुढे संशोधनात हे सिद्ध झालं की अमेरिका आणि युरोपातल्या रुग्णांपेक्षाही आफ्रिकन रुग्णांनीही औषधे अत्यंत काटेकोरपणे वेळच्या वेळी घेतली होती.
भारताने हा जो निर्णय घेतला तो इतका योग्य आहे की तो या रोगाला पसरू न देण्यासाठी अत्यंत मह्त्वाचा ठरेल. भारत ओनील सारख्यानची दर्पोक्ती नक्की फोल ठरवेल- आफ्रिकेने ठरवली तशी.
हा दिवस भारताच्या इतिहासात नक्की नोंदवला जाईल. अजून शंभरएक वर्षाने इतिहासाच्या तासात शिकवला जाईल- हाच तो दिवस जेंव्हा भारताने सगळ्या जगाला ठामपणे सांगितलं की या देशासाठी इथल्या लोकांचे जीव जास्त महत्वचे आहेत.
बचेंगे तो औरभी लडेंगे!
-डॉ. मृदुला बेळे
Comments
Post a Comment