'परदेशस्थ' मुलीचं पत्र
*'परदेशस्थ' मुलीचं पत्र*
हाय आई अणि बाबा
कसे आहात? तसं हे विचारायचं आत्ता लगेच काही कारण नाही, कारण चार महिन्यांचा आमच्याकडचा मुक्काम संपवून कालच तुम्ही घरी परत पोचला आहात. प्रवास छान झाला आणि सुखरूप पोचलात हे महत्त्वाचं!
आता काही दिवस आपण एकमेकांना खूप मिस करू, कारण एवढ्या दिवसांची सवय झालीय ना! मुलं तर आजी आजोबांना विशेष मिस करतील, आणि तुम्ही पण त्यांना. मग हळूहळू परत आपलं रुटीन सुरु होईल. तुम्ही तुमची मित्र मंडळींची गेट टूगेदर्स, गाण्याचे कार्यक्रम, जिम वगैरे मध्ये व्यस्त व्हाल आणि आम्ही आमचं काम, मुलांच्या शाळा, अशा रुटीन मध्ये. तसे आपण आठवड्यातून एकदा तरी ऑन लाईन बोलतोच , पण कदाचित कधीतरी महिनाभर बोलायलाही वेळ होणार नाही आम्हाला. तुम्हाला थोडं वाईट वाटेल,बोलून दाखवाल की फोन करत जा, विसरु नका आई बापाला वगैरे. मग आम्हालाही अपराधी वाटेल जरा! असं वर्ष दीड वर्ष जाईल आणि मग आमची एक चक्कर होईल घरी, किंवा परत तुमची आमच्याकडे!
हे पत्र काही खास कारणासाठी मुद्दामच लिहीत आहे. परदेशात राहणा-या, सेटल होणा-या भारतीय मुलांविषयी मिडिया मधून, बातम्यांमधून किंवा व्हाटस् अप मधून फिरणा-या पोस्टस् मधून, ही मुलं कशी स्वार्थी, बेजबाबदार आहेत, जन्मदात्या आईवडिलांना वा-यावर सोडून ही मुलं स्वत: कशी चैनीत जगतात अशा प्रकारच्या चर्चा मी नेहमी ऐकते वाचते. आणि नेहमीच मी अतिशय अस्वस्थ होते. चित्रपटांमधून, टी व्ही वरच्या मालिकांमधूनही काही अपवाद वगळता पुष्कळदा असाच सूर आळवलेला असतो. काही अंशी ते खरं असेलही. पण या परदेशात राहणाऱ्या, सेटल होणाऱ्या मुलांचीही काही बाजू आहेच ना आणि ती मला मांडायची आहे. माझं म्हणणं सगळ्यांना कदाचित बरोबर वाटणारही नाही.
गेली दहा बारा वर्ष आपलं आयुष्य असच आहे नाही? आम्ही शिक्षणासाठी इथे आलो तेव्हापासून. पहिली काही वर्ष खूप अवघड होती आपल्या दोघांसाठीही. रिकामं घर तुम्हाला खायला उठलं असणार आणि आम्ही पहिल्यांदाच घर सोडलेलं, तुमच्यापासून एवढं लांब असण्याची कधीच सवय नाही… बाकी सगळं सोडा, पण साधं स्वतःचं स्वतः करून खायचीही कधी गरज पडली नव्हती त्या आधी. इथे आलो आणि सगळंच अंगावर पडलं तेव्हा आई बाबांचं नुसतं असणं म्हणजे काय चैन आहे याची पहिल्यांदा जाणीव झाली.
पण नवीन जग होतं, नवीन अनुभव मिळत होते आणि भरपूर उत्साह होता. त्याच्या जोरावर आम्ही इथे जम बसवला. शिक्षण झालं, काम सुरु केलं… डोक्यात हा विचार पक्का होता की काही वर्ष नोकरी करायची, पैसे मिळवायचे आणि मग गाशा गुंडाळून भारतात परत! आई बाबा म्हातारे होतील तेव्हा आपण त्यांच्या बरोबर असूच असू.
नंतर लग्न झालं, मग मुलं झाली. मुलांच्या निमित्ताने तुमच्या भरपूर फेऱ्या झाल्या इथे! आपल्याला परत एकमेकांचा छान सहवास मिळाला.
पण मुलांच्या जन्मानंतर काहीतरी बदलत गेलं आमच्या मनात, आमच्याही नकळत! आत्तापर्यंत भारतात परतण्याबद्दल मनात जी क्लॅरिटी होती, तिच्या जागी वेगवेगळे विचार डोकं वर काढायला लागले. तुमच्यासाठी, घरासाठी, जुन्या मित्र मैत्रिणींसाठी, नातेवाईकांसाठी भारतात परतण्याची मनापासून इच्छा अजूनही कायम होतीच. किंबहुना मुलांचं आपल्या परिवाराशी घट्ट नातं निर्माण व्हावं यासाठी परत जायलाच हवं असं ठामपणे वाटत होतं. आपण जसे वाढलो, भारतीय कल्चर मधल्या ज्या गोष्टींचा, ज्या संस्कारांचा आपल्या जडणघडणीमध्ये एवढा मोठा वाटा आहे, ते संस्कार आपल्या मुलांवरही व्हायलाच हवेत अशी माझं तरी संपूर्णपणे ठाम मत होतं. त्याच दृष्टीनं पावलं उचलायची म्हणून आम्ही तिथे घरही घेऊन ठेवलं.
पण आता मात्र भारतातल्या काही गोष्टींकडे पाहण्याची आपली दृष्टी हळूहळू बदलतीय याची जाणीव मला व्हायला लागली होती. आपल्याकडल्या जीवनपद्धतीतले काही प्रश्न, जे फक्त स्वतःचा विचार करताना तितके महत्त्वाचे वाटले नव्हते तेच मुलांच्या दृष्टिकोनातून पाहताना जास्त ठळकपणे भेडसवायला लागले. प्रचंड प्रमाणात वाढलेली गर्दी, सदा सर्वदा जाम झालेलं ट्रॅफिक आणि प्रदूषण, सगळ्याच बाबतीत आणि मुख्य म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत चालणारा भ्रष्टाचार, त्यातून मुलांच्या डोक्यावर स्पर्धेचं, यशस्वी होण्याच्या दडपणाचं असलेलं प्रचंड ओझं, एकूणच सततचा संघर्ष आणि सुरक्षिततेची भावना या आणि अशा कित्येक गोष्टी एक व्यक्ती म्हणून आपण सहन करू शकतो, किंबहुना या सगळ्याशी सामना करतच आपणही या देशात लहानाचे मोठे झालो आहोत हे खरं! पण दुसरीकडे, इतकी वर्षं दुसऱ्या देशात चांगला जम बसवून चांगला पर्याय, चांगल्या संधी आपण आपल्या मुलांसाठी निर्माण केलेल्या असताना त्यांनाही याच चक्रातून जायला लावावं का असा प्रश्न जेंव्हा मी स्वतःला विचारला तेंव्हा त्याचं प्रामाणिक उत्तर 'नाही' असंच माझ्या आतून आलं.
असं जरी असलं तरी आता कायमचं इथे रहायचं हा निर्णय घेणं अतिशय अवघड होतं. गेली बारा वर्षं हा निर्णय आम्ही लांबणीवर टाकत होतो याचं कारण हेच! इथे या परक्या देशामध्ये आपण रुजलो आहोत असं मला तरी कधीच वाटलं नाही. इथे सगळं काही आहे, पण आपलं कुटुंब नाही याकडे माझं मन कधीच दुर्लक्ष करू शकलं नाही. इथल्या लोकांची एंजाॅयमेन्टची व्याख्या सुद्धा माझ्या कधीही पचनी पडली नाही. क्लबींग करणारी, ड्रिंक्स घेण्यात मिरवण्यासारखं काही आहे असं मानणारी मुलगी मी तेंव्हाही नव्हते आणि अजूनही नाही. माझ्या आनंदाच्या जागा होत्या माझे आई बाबा, मित्र मैत्रीणींबरोबर केलेला टाईमपास, एकत्र साजरे केलेले सण, नाटकं सिनेमे बघणं, रस्त्यावर वडापाव पाणीपुरी खाणं, इतरांच्या लग्नांमध्ये केलेली धमाल.. अजून काय काय सांगू? हे सगळं कायमचं सोडायचं आणि इथेच राहायचं? कायमचं? ठीक आहे.. नोकरी जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कदाचित आपण या गोष्टींना मिस करणार नाही, तेवढा वेळच मिळणार नाही, पण पुढे काय? म्हातारपणी, मुलं त्यांच्या त्यांच्या मार्गांनी गेली की आपण काय करणार? इथे हाताच्या बोटांवर मोजता येण्याएवढं आपलं मित्रमंडळ आहे. तेही आता वेगवेगळ्या शहरांमध्ये विखुरलंय.. मग इथे जगायचं कशाच्या जीवावर?
पण सगळ्यात अवघड गोष्ट सांगू? हा निर्णय घेतल्यामुळे आलेली अपराधीपणाची भावना! आपले आई वडील आणि आपली मुलं यांच्यामध्ये निवड करायला लागल्यामुळे आलेली. ती जन्मभर आम्हाला सलत राहणार आहे. आमचं तुमच्यावर अतिशय मनापासून प्रेम आहे. आई बाबांना सोडून कायमचं इथेच कसं काय राहायचं या एका प्रश्नावर विचार करण्यात आमचे कित्येक तास, कितीतरी शक्ती खर्ची पडली आहे. दर वीकेंडला इथल्या मित्रांबरोबर रात्र रात्र जागून ज्या चर्चा व्हायच्या त्यात हा विषय सगळ्यात मोठ्ठा असायचा. आम्हीही आता आई बाप आहोत. मुलांवरचं प्रेम म्हणजे काय असतं, ती अॅटॅचमेंट कशी असते याची आम्हालाही थोडीशी झलक मिळालीय. कालांतराने आपले आई वडील म्हातारे होतील, आत्ता त्यांना रिकामपण जाणवंतच पण काही काळानं आपली खरीखुरी, प्रत्यक्ष गरज पडेल. तेव्हा आपण वेळेला जाऊ शकू ना? अचानक त्यांच्या तब्येतीचं काही कमी जास्त झालं तर? देव न करो पण रात्री अपरात्री फोन तर नाही ना येणार एक दिवस? काही न बोलताच निरोप घ्यावा लागला तर.. हे विचार मनात येऊ द्यायचे नाहीत म्हटलं तरी ब्रह्मराक्षसासारखं त्यांचं अस्तित्व सतत मनाच्या एका कोपऱ्यात जाणवत असतं.
खरं तर तुम्ही इथे आमच्याबरोबर रहायला आलेलं आम्हाला अगदी मनापासून आवडेल! पण तुमचं मन इथे रमणार नाही हे माहितीय आम्हाला. माझा एक श्रीलंकन बॉस होता. त्याची स्टोरी सेम अशीच. तो हट्टानं त्याच्या आई वडिलांना इकडे घेऊन आला. मला सांगत होता की ते कधीच इथे रमले नाहीत. शेवटपर्यंत श्रीलंकेतल्या त्यांच्या घराची आठवण काढत असायचे. त्याचा गिल्ट असा की इथे आणूनही तो त्याच्या आई वडिलांना सुखी ठेऊ शकला नाही. मला म्हणाला की आयुष्यभर ही बोच राहील मनात. तसाच तुमच्यावर हा निर्णय जबरदस्तीनं लादुनही आम्ही जिंकणार नाहीच याची आम्हाला जाणीव आहे.
असं सगळं असूनही आम्ही इथे राहायचा निर्णय घेतलाय. का? मला वाटतं की हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक पिढी ही पुढच्या पिढीचा विचार करून निर्णय घेत असते. मागच्या पिढीशी नातं कितीही घट्ट असलं तरी जेंव्हा प्राधान्य कशाला द्यायचं ही वेळ येते तेंव्हा ती पुढच्या पिढीलाच द्यावी लागते किंवा दिली जाते. तुमचंही तसंच नाही का? तुम्ही दोघंही खेडेगावांमधून पुण्यात आलात. शिक्षणासाठी, नोकरीसाठी.. आमच्यासारखंच! मग आमचा जन्म झाल्यावर तुम्ही तुमच्या गावाला परत गेला असतात, आम्हाला घेऊन? आम्हाला चांगल्या संधी मिळाव्यात, आमच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळावी म्हणून तुम्ही जसे गाव सोडून शहरात स्थलांतरित झालात, तसाच इकडे स्थायिक होण्याचा निर्णय आम्हाला आमच्या मुलांसाठी घ्यावासा वाटतोय. आता हा फरक आहेच की आपल्यातलं अंतर खूप जास्त आहे. तुम्ही, मनात आलं की तास दोन तासात तुमच्या आई वडिलांना भेटू शकत होतात, त स्वातंत्र्य आम्हाला नाही. आणि याचं जेवढं दुःख तुम्हाला आहे तेवढंच आम्हालाही आहे.
आपल्याकडच्या टी व्ही सिरियलमध्ये सिनेमांमध्ये जेंव्हा अशी दृश्य दाखवतात ना ज्यात म्हातारे आई वडील मुलांबद्दल म्हणतात 'आमचा मुलगा / मुलगी परदेशात जाऊन आम्हाला पार विसरून गेले हो' तेंव्हा मला अगदी मनापासून वाईट वाटतं. मला मान्य आहे की जगात अशी मुलं नक्कीच आहेत. आणि फक्त भारतातच नाही तर इतर कुठल्याही देशांमध्ये अशी मुलं सापडतीलच. पण याच एका तराजू मधून सगळ्यांना तोलणं चुकीचं नाही का?आमच्यासारख्यांचं काय, जे आई वडिलांना मुळीच विसरले नाहीयेत, उलट आई वडील आणि आपली मुलं यांच्यामध्ये निवड करायला लागल्यामुळे आयुष्यभर अपराधीपणाची भावना घेऊन जगणार आहेत. तुमची खूप खूप आठवण येते आम्हाला! आजारी पडलं की रात्र रात्र उशाशी बसून तुम्ही केलेली जागरणं आठवतात, कधी काही मनाविरुद्ध घडलं की तुम्ही समजावलेलं आठवतं, अपयश आलं तर तुम्ही दिलेलं प्रोत्साहन आठवतं, आम्हाला घेऊन केलेल्या ट्रिप्स आठवतात, अवघड आर्थिक परिस्थितीतही आमच्या गरजांना प्राधान्य दिलेलं आठवतं. कधीही काहीही अडचण आली तर पर्वतासारखा खंबीर आधार होतात तुम्ही आमचा, आणि अजूनही आहात. या प्रेमाची कुठेही रिप्लेसमेंट मिळणं शक्य नाही हे पुरेपूर माहितीय आम्हाला. हे प्रेम हाच तर आमच्या जगण्याचा आधार आहे. पाया आहे. मग आम्ही तुम्हाला विसरलो असं कसं?
तुम्ही जो ठेवा आम्हाला दिलाय तोच आम्ही आमच्या मुलांना द्यायचा प्रयत्न करतोय. त्यांचा भक्कम आधार, राॅक साॅलीड सपोर्ट बनण्याचा प्रयत्न करतोय. उद्या तीही आम्हाला सोडून दुसऱ्या देशात जातील. त्यांना काही वेगळी क्षितिजं खुणावतील. मग आम्ही तुमच्या जागी असू. आम्हाला हे स्वीकारणं कदाचित तुमच्यापेक्षा सोपं जाईल कारण तशी मानसिक तयारी आमची आमच्या स्वतःच्या अनुभवामुळे झाली असेल. किंवा नाहीही जाणार, कोणास ठाऊक? माझं हे म्हणणं जरा हास्यास्पद वाटेल तुम्हाला, पण मला तुमचा हेवा वाटतो कधी कधी. तुमची मुलं तुमच्यापासून लांब गेलीयेत खरी, पण तुम्हाला किमान तुमची जागा माहितीय, तुमची स्वतःची, हक्काची जागा.. तुमच्या अवतीभवती तुम्ही जोडलेली कितीतरी माणसं आहेत जी एका हाकेत तुमच्यासाठी धावून येतील. आम्ही तुमच्या वयाचे होऊ ना, तेव्हा आमची मुलं तर नसतीलच आमच्यापाशी शिवाय मोजके चार मित्र सोडले तर बाकीही फार कोणी नसेल, कारण इथल्या लोकांशी तशी मैत्री, तसे संबंध निर्माण होऊच शकत नाहीत. ही आमची हक्काची जागा नाही आणि कधी होणारही नाही!
एवढं सगळं बोलण्याचं प्रयोजन हे की आमच्यासारख्या देश सोडून गेलेल्या अनेक मुलांकडे एकाच चष्म्यातून प्लीज पाहू नका. प्रत्येकाची कारणं वेगळी असतील, परिस्थिती वेगळी असेल पण किमान नव्वद टक्के मुलांना हा पर्याय निवडताना आई वडिलांना मागे सोडायला लागल्यामुळे genuinely दुःख झालेलं आहे. त्यातून कुठलीही support system नसल्यामुळे इथे येणारी आव्हानं वेगळीच! ही परिस्थिती बदलणं आता दोघांच्याही हातात नसलं तरी त्यांचं तुमच्यावर तितकंच प्रेम आहे हे तुमच्यापर्यंत पोचवणं मला गरजेचं वाटलं, आमची बाजू मांडणं गरजेचं वाटलं म्हणून हा प्रपंच. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये प्रेम व्यक्त करण्याची पद्धत नाही. प्रत्येक वेळी फोन वर बोलून झाल्यावर love you म्हणलं की ते प्रेमाचं प्रदर्शन वाटत आपल्या लोकांना. पण कधीच व्यक्त केलं नाही तर प्रेम आहे हे समजणार कसं? त्यामुळे आज सांगतीय.. आम्ही तुमच्या जवळ नसलो तरी आमचं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे. तुमच्या वेळेला धावून येण्यासाठी आम्ही आकाश पाताळ एक करू, पण तरीही काही कारणानं पोचू शकलो नाही तर प्रेम नाही म्हणून आलो नाही असा गैरसमज प्लीज करून घेऊ नका.
बाकी मस्त मजेत रहा आणि तब्येतीची काळजी घ्या. आपल्याला अजून खूप साऱ्या trips करायच्यायत, मुलांना आजी आजोबांकडून भरपूर लाड करून घ्यायचेत, खूप सारा एकत्र वेळ घालवायचाय, त्यामुळे तुम्ही fit राहण्याला पर्याय नाहीये!
So, आत्तापुरतं अच्छा बाय बाय.. पुढच्या trip पर्यंत!
तुमची, तुम्हाला अजिबात न विसरलेली,
'परदेशस्थ' मुलगी
Comments
Post a Comment