स्वभाव पदार्थांचे
*स्वभाव पदार्थांचे* माणसांचे भिन्न स्वभाव असतात, वैशिष्ट्ये असतात. तसेच पदार्थांचेही असते, असं माझं मत आहे. *_इडली_* ही मवाळ प्रवृत्तीची. अगदी लहान बाळापासून-वृद्धांपर्यंत कुणाशीही दोस्ती करणारी आणि कुणाबरोबरही संसार थाटणारी. तिला सांबाराचा संग चालतो नि चटणीचीही चटक लागते. लोण्याबरोबर नि लोणच्याबरोबर तिचं तितक्याच आनंदाने जमतं. तुपाबरोबर नि दुध-गुळाबरोबरही ती सुखाचा संसार थाटू शकते. _कधी कुणाला ठसका लावणार नाही नि कधी कुणाला रडवणार नाही._ _पण एक नंबरची लहरी बरं का ही!_ _कधी आनंदाने फुलेल तर कधी रुसून चपटी होऊन बसेल._ *मिसळ* मिसळीचं अगदी उलटं. ही जहाल मतवादी पक्षाची सदस्या! हिच्यात मवाळपणा औषधालाही मिळणार नाही. फक्त तरुणांची सोबत हिला आवडते. बालके नि वृद्ध हिच्या आसपासही फिरकू शकत नाहीत. रूपानं देखणी, लालबुंद वर्णाची ही ललना केवळ दर्शनाने नि गंधाने लाळ गाळायला लावते. पण हिचा स्वभाव असा तिखट की खाणारा कितीही मर्दानी गडी असला तरी पहिल्या घासाला ठसका लागणार, ही काळ्या दगडावरची रेघ! *भेळ* नटरंगी.... चिंचेच्या चटणीचा आंबटगोडपणा, कांदा-कोथिंबिरीचा स्वाद, फरसाणाचा खमंगपण...