सहजीवन म्हणजे
सहजीवनाची ३० वर्षे....
सहजीवन म्हणजे,
स्वप्न बघणं, साद घालणं, हवं नको सांगणं,
अटीतटीला येऊन कधी तुटेल की कायसं वाटणं.
सहजीवन म्हणजे, उतायचं नाही, मातायचं नाही,
घेतला वसा टाकून कधी तुटेपर्यन्त ताणायचं नाही.
सहजीवन म्हणजे अनेक होकार,
किती तरी नकार
सहजीवन म्हणजे, एकमेकांच्या भावनांचा सन्मान, एकमेकांच्या माणसांचा स्वीकार.
सहजीवन म्हणजे, एकमेकांचं मन समजून घेणं, एकमेकांच्या दु:खावर फुंकर घालणं.
सहजीवनात नाही एकाचीच भरारी, नाही एकाचीच मक्तेदारी.
सहजीवनात नसतं बंदिस्त, दोघांचंच, दोघांपुरतच.
कुटुंब,गणगोत, आप्त, मित्र सामावून घेणं.
पंख फुटून भरारणाऱ्या पिल्लांना आनंदाने निरोप देणं.
चुकली माकली थकली तर उबदार सेज तयार ठेवणं.
सहजीवन म्हणजे परस्परांसाठी हमेशा खुला चौथा कमरा
'जा त्या घरी' न म्हणणारा विश्वासाचा कोपरा.
सहजीवन म्हणजे चुकल्या-माकल्याचा सहज दिला जाणारा हिशोब
सहजीवनात 'सॉरी' म्हणायला कशासाठी असावा संकोच?
सहजीवन म्हणजे पिकतांना मिळून आठवायची सारी कथा,
'माझ्याआधी तू जायचं नाही' एकमेकांना घालायच्या शपथा!!
Comments
Post a Comment