अभियंता

अभियंता,
अजातशत्रू, 
सर्वांचे परममित्र, 
हुशार सीओईपीयन्स,
सर्वमान्य व्यक्तीमत्व,
उच्चपदस्थ अधिकारी,
दिलदार, विशाल हृदयी,
साधे, सरळ, मनमिळावू,
शांत, सुस्वभावी, सज्जन, 
स्वच्छ उच्च विचारसरणी,
गोड, स्वच्छ, खुली वाणी,
साधी बिगरदिखावा राहणी,
सर्वच थरात एकरुप होणारी,
कुणालाही तुच्छ न लेखणारी,
कुणाचाही अपमान न करणारी,
सर्वांना सोबत घेऊन चालणारी,
कनिष्ठांशीपण प्रेमाने वागणारी,
सचोटी इमानदारीत काम करणारी,
हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेणारी,
केलेल्या कामांचा दिखावा न करणारी,
पुरस्कारा करिता वशिला न लावणारी,
शासन दरबारी हांजी हांजी न करणारी,
नियम कायदा चौकटीत काम करणारी,
कुटुंब मित्र सहकारी सर्वां सांभाळणारी,
शासकीय सेवेत पण कामसू परोपकारी,

अजूनही अशा कैक सद्गुणांनी भरलेली ही *शिवाजी व सुनीलची अधीक्षक अभियंत्यांची जोडी*, आज ३६ वर्षाच्या प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर निवृत्त होत आहे. सीओईपी ८४ स्थापत्य अभियंता या बॅचमधील सरकारी नोकरीत असणाऱ्या सर्व बॅच मेट्स मध्ये *सर्वोत्कृष्ट सरकारी अधिकारी व सर्वोत्कृष्ट अभियंता* म्हणून या जोडीला पहिल्या नंबरचे पारितोषिक न बोलता न सांगता कुठलाही गाजावाजा न करता आपण सर्वांनी त्यांना दिलेलेच आहे.

सर्वसाधारण परिस्थितीतून पुढे येऊन, सीओईपी सारख्या प्रतिष्ठित संस्थेतून शिक्षण घेऊन, सरकारी दप्तरी उच्च पदापर्यंत बढती मिळवून, सर्वमान्य असे मित्र अधिकारी सहकारी राहून, सर्वांना बरोबर घेऊन, या दोन्ही मित्रांनी जे यश मिळवले आहे ते नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्या हातचा प्रत्येक प्रकल्प हा त्यांच्या इमानदारीने सचोटीने व मेहनतीने उभा राहिलेला आहे. या दोन्ही अभियंत्याची निदर्शनाला आलेली एक खास गोष्ट म्हणजे, या दोघांनी आपल्या शासकीय नोकरीच्या या प्रदीर्घ काळात जरी अनेक उल्लेखनीय कामे केली असतील तरी कधीही शासकीय नियम कायदा डावलून किंवा उच्चपदस्थ अधिकारी, राजकारणी यांच्या संबंधाचा फायदा घेऊन किंवा वशिला लावून कुठलेही पुरस्कार मिळण्यासाठी कधीही प्रयत्न केला नाही. त्यामुळे त्यांना जे पुरस्कार मिळणे आवश्यक होते ते मिळालेले नसले किंवा वेळच्या वेळी जी पदोन्नती होणे आवश्यक होती ती झाली नसली तरी, आपण सर्वांनी त्यांना ते पुरस्कार व ती पदोन्नती वेळच्या वेळी मनातून देऊन टाकलेलीच आहे. या दोघांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक माणसे प्रेमाने जोडली. या दोघांचे एक वैशिष्ट्य म्हणजे, कनिष्ठ कर्मचाऱ्यांना यांनी कधीच वाईट किंवा अपमानास्पद वागणूक दिली नाही. सर्वांशी बोलणे नेहमी प्रेमळ समजूतदार पणाच्या भाषेतच राहिले. शिवाय एवढ्या उच्च पदावर काम करत असताना देखील कधीही बडेजावपणा, दिखाऊपणा केला नाही किंवा आपण इतरांपेक्षा कुणीतरी वेगळे आहोत हे ही दर्शवण्याचा प्रयत्न कधी केला नाही. बॅचमधील एखादा मित्र कनिष्ठ अधिकारी असताना, त्यांना कधी वरिष्ठ अधिकाऱ्यासारखी वागणूक तर दिलीच नाही पण तिथेही त्यांना मित्र समजून एकसारखीच वागणूक दिली. कुणाचाही अपमान न करता सर्वांना प्रेमाने, समजावून घेऊन, समजावून देऊन, सर्व काम ते करत राहिले व त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणारे सर्व सरकारी कर्मचारी, अधिकारी यांना आजही त्यांच्याविषयी पूर्णपणे आदर वाटतो. असा मान सन्मान मिळवून, अजात शत्रू राहिले हिच खरी शासकीय कमाई या दोघांनी त्यांच्या कारकिर्दीत केली. जेव्हा जेव्हा सीओईपी ८४ बॅचचे मित्र एकत्रित भेटतात, तेंव्हा एक उच्चपदस्थ सरकारी अधिकारी म्हणून इतर सर्व कनिष्ठ सरकारी अधिकारी मित्रांशी, गरीब मित्रांशी, यांची वागणूक अतिशय सन्मानपूर्वक व बरोबरीनेच राहिलेली आहे. एक गोष्ट मात्र नक्कीच मानण्यासारखी आहे आणि ती म्हणजे, सरकारी नोकरीत असूनही यांची दिलदार प्रवृत्ती. मित्रांमध्ये किंवा कुठेही खर्च करायच्या वेळी सर्वप्रथम यांचा हात खिशात जातो. मित्रां करता, सहकार्यां करता, समाजाकरता, सर्वां करताच यांचे खर्चाच्या बाबतीत धोरण नेहमीच उदार राहिलेले आहे. आणि विशेष म्हणजे जे काही केले त्याचा कधी उल्लेख, गवगवा ही हे करत नाहीत. 

कुटुंबाच्या बाबतीत पण या दोघांनी आपली जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे. नशिबाने दोघांनाही चांगली, हूशार, समजूतदार, सहचारिणी मिळाल्यामुळे, घर गृहस्थी या विषयात या दोघांना फारसे लक्ष द्यावे लागले नाही. सहचारिणीच्या उत्तम सहकार्यामुळे, मुलांमुलींचे शिक्षण, त्यांचे जोडीदार, संसार सर्वच बाबतीत यांना चांगलेच यश मिळालेले आहे. हे दोघेही हौशी कलाकार असल्यामुळे, यांनी जीवनाचा भरपूर आनंदही घेतलेला आहे. ना कधी स्वतः रडत बसले ना दुसऱ्याला कधी रडू दिले. स्वतः खुश राहिले व दुसऱ्यांनाही खुशी दिली. मित्रा मित्रात, नातेवाईकात, समाजात, स्वतःहून भरपूर वेळ देऊन, फक्त जोडण्याचेच काम केले, तोडण्याचे नाही. मान-अपमान, बडेजावपणा, दिखाऊपणा, अहंकार, कुत्सीतपणा, दुसर्‍यास कमी लेखणे व स्वतःच्या खिशास कधी तोषिश न लागू देणे, कारण/गरज नसताना सरकारी खर्चाने सर्व काही उरकणे, असे बरेच काही दुर्गुण (सहसा ब-याच ठिकाणी दिसणारे) यांना कधी शिवलेच नाही. एकूणच सरकारी नोकरीत राहूनही एवढे चांगले व्यक्तिमत्व, एवढ्या सद्गुणांसहित टिकवणे हे या दोघांना शक्य झाले याचे एक मित्र म्हणून, एक अभियंता म्हणून, एक सीओईपीयन म्हणून मला नक्कीच अभिमान व कौतुक वाटत राहील.

अशी ही सन्माननीय जोडी आज निवृत्त होत आहे. त्यांना त्यांच्या निवृत्ती पश्च्यातच्या वाटचाली करता माझ्या सर्व कुटुंबियांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🌹🙏

संजय बोरा, पुणे
३०/०५/२०२०

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार