मॅटीनी

*मॅटीनी*                        

परवा एका फॅमिली गेट टूगेदरला गेलो होतो. एकाने जोक सांगितला. एक मित्र सरदारजी ला  विचारतो "काल भेटला नाही?" सरदारजी "सिनेमा ला गेलो होतो" मित्र "कसा होता? ट्रॅजेडी की कॉमेडी?" सरदारजी "अरे  तो मॅटीनी होता". जोक ऐकून सर्व जण हास्यरसात बुडून गेले. पण मी मात्र मॅटिनी शब्द ऐकला आणि चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वीच्या काळात - साधारण १९७०-७१ च्या सुमारास - पोहचलो.                                    

मल्टिप्लेक्स हे नावही कोणी ऐकले नव्हते. पण नवीन चित्रपट एका पेक्षा जास्त थिएटर्स मधे लागत होते. पुण्यात कोणताही नवीन चित्रपट लागायचा तेव्हा एक मुख्य थिएटर असायचे आणि तेव्हा नुकत्याच विकसित झालेल्या उपनगरांमधील थिएटरमध्येही तो लागायचा. मुख्य थिएटरमध्ये दुपारी तीन, संध्याकाळी सहा आणि रात्री नऊ असे तीन शो दाखवले जायचे. दुपारी बारा वाजताच्या शो ची वेळ - मॅटीनी शो साठी - मुद्दाम जुन्या सिनेमासाठी राखून ठेवली जायची. उपनगरांमधील थिएटरमध्ये मात्र दुपारी बारा वाजता मॅटीनी शो च्या वेळीही नवीनच सिनेमा दाखवीत असत.           दुपारी बाराचा मॅटीनी शो हे जादूभरे शब्द होते. मॅटीनी शो ची मोहिनी जबरदस्त होती. त्या काळी ५ ते २५ वर्षे जुने असलेले चित्रपट म्हणजे साधारण १९४५ ते १९६५ या काळातील चित्रपट मॅटीनीला दाखवले जायचे. त्यामुळे या मॅटीनी शो ला अबाल वृद्धांची गर्दी असायची. तेव्हाची प्रौढ पिढी ५०/५५ वयाची अंदाज, बरसात. अनारकली. बैजूबावरा. बाझी. नागिन वगैरे चित्रपटांना गर्दी करून आपल्या तेव्हाच्या आठवणी ताज्या करीत असे. साधारण ३०/४० वयोगटातील पिढी पेईंग गेस्ट. मधुमती. अनाडी. तुमसा नहीं देखा मधील गाण्यांवर ताल धरण्यासाठी, उजाला, शरारत मधील "मोरा नादान बालमा" "तेरा तीर ओ बे पीर" गाण्यांवरील कुमकुमच्या डान्स वर शिट्ट्या मारायला या चित्रपटांच्या वार्या करीत. नंतरची नवीन पिढी एक मुसाफिर एक हसीना. चायना टाऊन. जंगली. मेरे मेहेबूब. राजकुमार. हम दोनों या चित्रपटांवर  फिदा होती. देव आनंद, शम्मी कपूर आणि राजेंद्र कुमार हे मॅटीनी आयडॉल होते. त्यांचे चित्रपट मॅटीनी शो ला गर्दी खेचत असत.                               

या मॅटीनीला आणखी एक प्रेक्षक वर्ग होता. तो म्हणजे वाड्यातील १४/१५ जणांचा निरनिराळ्या वयांच्या व्यक्तींचा पण एकत्र असलेला कंपू. वर्षातून पाच वेळा तरी हा कंपू एकत्र यायचा. एकदा नदीला पाणी आले की ते पहायला लकडी पुलावर (आताचा संभाजी पूल - तेव्हा पुण्यात नदीवर तीनच पूल होते लकडी पूल नवा पूल आणि संगम ब्रिज) हा कंपू जाणार. दुसरे म्हणजे वाड्यातील जो कोणी (अकरावी) मॅट्रिकला असेल त्याला बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी डबा घेऊन भेटायला हा कंपू जाणार. (तेव्हा एका दिवसात अकरा ते दोन आणि तीन ते सहा असे दोन पेपर असत. त्यामुळे या परीक्षार्थीला मधल्या वेळात डबा देत असत) तिसरे म्हणजे उन्हाळ्यात सुट्टीत दुपारी चार वाजता जाऊन भरपूर खेळणार आणि भेळ खाऊन रस पिऊन घरी येणार. चौथी वेळ म्हणजे दिवाळीच्या सुट्टीत शनिवार /नारायण पेठेतून वाड्यातूनच डबे घेऊनच निघून अरण्येश्वर पद्मावती किंवा विठ्ठलवाडी पर्यंत पायी जाऊन दिवस भराची ट्रीप एन्जॉय करायचा. हाच कंपू वर्षातून एकदा मॅटीनीला जात असे. काका काकू मावशी दादा ताई मुले सर्व असल्याने जागृती. चलती का नाम गाडी. भाभी. छोटी बहन यासारखे चित्रपट निवडले जात.                              

युवकांमध्ये मॅटीनीचे वेड जास्त होते. मधुबाला मीना कुमारी माला सिन्हा शकीला साधना यांच्या चित्रपटांना तर तोबा गर्दी होत असे. शिवाय मॅटीनीचे तिकीटाचे दरही कमी असत. डेक्कन. विजय. भानुविलास या थिएटर्सचे दर खूप स्वस्त होते. 

भानुविलासला लोअर स्टॉल ६० पैसे अपर स्टॉल ८० पैसे बाल्कनी १ रुपया ५ पैसे असे दर होते. स्टेशन जवळचे अलंकार मॅटीनीला सर्वात महागडे थिएटर होते. लोअर स्टॉल १ रुपया. अपर स्टॉल १ रुपया ३० पैसे आणि बाल्कनी १ रूपया ६५ पैसे असे तिथले दर होते. शिवाय इतक्या लांब जायचे म्हणजे सायकलने जाणे आले. सायकल स्टॅन्डच्या १०/१५ पैशाचीही सोय करावी लागत असे. आज चार आणे (२५ पैसे) कमी आहेत तर बाल्कनी ऐवजी अपर स्टॉल मधे बसू असा २५ पैशाचा हिशेब करणारे आपणच होतो हे आठवले की आपलेच आपल्याला हसू येते.          पण ४५ वर्षांपूर्वी परिस्थिती तशीच होती. तेव्हा communication ची साधने एवढी नव्हती. जुने सिनेमे पहायला भाग्य लागायचे. आज केव्हाही नेटवर हवा तो सिनेमा पाहता येतो. तेव्हा तसे नव्हते. "आहें ना भरी" ही हिंदी सिनेमातील पहिली कव्वाली ज्या मधे होती आणि नूर ए तरन्नुम नूरजहाँ नायिका होती (आंधियां गमकी यूं चली) तो "झीनत" नावाचा सिनेमा माझ्या आठवणीत फक्त एका रविवारी मॅटीनीला एका शो पुरता विजयानंद ला दाखवला होता. तोपर्यंत नूरजहाँचा एकही चित्रपट पाहिला नव्हता. अर्थातच ती संधी आम्ही सोडली नाही हे वेगळे सांगणे नलगे । पण सांगायची गोष्ट अशी की हे फक्त मॅटीनी मुळे  शक्य झाले.                                 

मॅटीनीला जायचे ठरवणे हा एक प्रोग्रामच असायचा. चार पाच जणांचे टोळके त्यावर चर्चा करीत. "परवा कुठला टाकायचा?"  कोणी तरी विषयाला तोंड फोडत असे. "असली नकली" ला जाऊ. कोणी तरी 'आपली आवड' सांगायचा. (तेरा मेरा प्यार अमर' गाण्यातली साधना पुन्हा एकदा पाहण्याचा मोह त्याला झालेला असायचा. तेव्हा सिनेमा शिवाय गाणे पाहण्याची दुसरी काहीच सोय नव्हती). तिसरा म्हणायचा 'दिल देके देखो' ला चला यार शम्म्याला बरेच दिवसात पाहीले नाही. आता हा ठराव पास होणार तेवढ्यात एक जण म्हणायचा "हे सगळे नंतर बघता येतील." निशात "ला" बावरे नैन "लागला आहे तो बघू." बाकीचे सगळे प्रश्नार्थक चेहरे करतात. तो पुढे स्पष्टीकरण द्यायचा "अरे मुकेशचे तेरी दुनिया में, खयालों में किसी के, राजकुमारी चे सुन बैरी बलम गाणी आहेत त्यात. आणि राज कपूर हीरो आहे आणखी काय हवे?" मंडळींना त्याचे म्हणणे पटायला लागले असते पण थोडे साशंक असतातच. पण तो संशय  दूर करण्यासाठी "आणि पिक्चरमध्ये गीता बाली नऊवारी मध्ये आहे बरं का " असे तो शेवटचे अस्त्र काढतो. लगेच बावरे नैन वर शिक्कामोर्तब होते आणि रविवारी अंमलबजावणी होते.        दुसऱ्या ग्रुपला वेगळीच चिंता लागलेली असायची. फण्डस ची! पक्या म्हणायचा "विष्ण्या, (याचे खरे नाव सुधीर) च्यायला, खूप दिवसात लेका तू पिक्चरची सोय केली नाहीस. यावेळी काही तरी कर". (जुन्या नोटा चलनातून बाद होतात तसे च्यायला, लेका हे शब्द बाद होत आहेत.) तो देखील ही आपली नैतिक जबाबदारी असल्यासारखे स्वीकारून "बघतो. करतो काही तरी" असे आश्वासन द्यायचा. (ही वेळ प्रत्येकावर कधी तरी यायचीच). रविवारी सकाळी अकरा वाजता आळीच्या तोंडाशी पारावर ग्रुप त्याची वाट बघत बघायचा. खिशात हात घालून शिट्टी वाजवत येणारा विष्ण्या दिसला की काम फत्ते झाले हे कळायचे. "कुठून जुगाड लावलंस रे?" कोणाची तरी उत्सुकता बाहेर पडायचीच. "होती घरात तीन महिन्यांची रद्दी. आपलं काम झाले. ठरवा कुठे जायचं आहे ते." उत्तर मिळायचं "ठरवा काय? बंड्या गेलाय आधीच लायनीत नंबर लावायला " मग सर्व मंडळी आधीच ठरलेल्या "चौदहवीं का चांद" पहायला जायची.                                       

तेव्हाच्या तरूणीही मॅटीनीला जाण्यात मागे नव्हत्या. चार पाच मैत्रिणी प्रत्येकीच्या घरी जाऊन तिच्या आईला "काकू आम्ही सिनेमाला जातो ना. संध्या सुनंदा शैला सगळ्यांच्या आईनी परवानगी दिली आहे. तुम्ही पण रंजनाला पाठवा ना" असं सांगून सर्व आयांची परवानगी घेत. सिनेमाला जायचे ठरले, सिनेमा, थिएटर सर्व ठरले आता प्रश्न एकच. "एवढ्या गर्दीत तिकिटाच्या लायनीत तास भर उभे राहून तिकीट कोण काढणार? मग त्यातली रंजना - म्हणजे माझी ताई - मला म्हणायची" आम्हाला तिकीटे काढून दे ना " मग मी - इयत्ता दहावी - पांढरा शर्ट खाकी हाफ पॅन्ट मधे खोचून ताईने दिलेले सहा रुपये संभाळत थिएटर मध्ये तिकीटांच्या लायनीत तास सव्वा तास आधीच जाऊन उभा रहायचो. त्यातून ग्लोब (श्रीनाथ) किंवा मंडईतले मिनर्ह्वा (आता वाहनतळ) थिएटर असले तर विचारूच नका. तिकीट खिडकी पर्यंत जाण्यासाठी संपूर्ण लायनीलाच लाकडी खुराड्यातून जावे लागे. पावणे बारा वाजता ताई आणि तिच्या मैत्रिणी आल्या आणि माझ्या कडून तिकीटे मिळाली की माझी रवानगी घरी व्हायची. 'मैत्रिणींमधे तू कशाला? "म्हणून मला कन्नी दिली जायची.  तिच्या साठी मेरे सनम, तीसरी मंजिल ची तिकीटे काढलेली पक्की लक्षात आहेत. पण पुढे आणखी मोठे झाल्यावर याच ताईने मला मॅटीनीलाच नेऊन मिस मेरी, शबाब आणि नई दिल्ली हे सुंदर चित्रपट दाखवले हे ही तितकेच खरे!                           

'नव्या ओळखी' करण्यासाठी मॅटीनी तिकिटांची लाईन हे एक व्यासपीठ होते. एखाद्या मुलीला हेरून एखाद्या दिवशी थिएटर मध्ये तिला लायनीत उभे राहिलेले पाहून तेव्हाची सर्व कामे विसरून तो मॅटीनी शो पाहणारेही काही वीर होते. तसेच स्त्रियांच्या रांगेत उभे असलेल्या हव्या त्या मुलीला "मिस, एक्सक्यूज मी पण जेन्टस लाईन फारच मोठी आहे. तिकीट मिळेल असे वाटत नाही. प्लीज आमची दोन तिकीटे काढता का?" असं म्हणून तिच्या हातात पैसे देणारे वीरही होते. आणि त्यात जर पलीकडून प्रतिसाद मिळाला तर मग काय- बहार ही बहार!          

या नवीन झालेल्या ओळखी वाढवण्यासाठीही मॅटीनी  फार उपयोगी पडत. 'कोहरा' 'आरती''बात एक रात की' वगैरे चित्रपट मॅटीनीला लागत पण रविवार आणि सुटी सोडून इतर दिवशी त्यांना फारशी गर्दी नसे. त्यामुळे असे चित्रपट, झालेल्या ओळखी वाढवण्यासाठी सोईस्कर असत.                                          

मॅटीनी वरून एक गंमत आठवली. घरी पाहुणे आले होते. वडीलांना रात्रीच्या शो ची तिकीटे काढून आणायला सांगितले होते कारण थिएटर त्यांच्या अॉफीस जवळ होते. संध्याकाळी साडे पाच वाजता ते आले आणि मला तिकीटे दिली. तिकीटे पाहून मी चुकलो. "काका ही तर संध्याकाळी साडे सहाच्या शो ची तिकीटे आहेत. तेही गोंधळले. म्हणाले" अरे पण मी तर सेकंड शो चीच तिकीटे मागितली होती. " मग मी म्हणालो " काका दुपारी तीन चा शो पहिला, संध्याकाळी सहाचा शो दुसरा आणि रात्रीचा शो तिसरा असतो " ते म्हणाले" असं होय?  आमच्या वेळी संध्याकाळी पहिला आणि रात्रीचा शो दुसरा असायचा "मग सर्वांनी धावपळ करत संध्याकाळी साडे सहाचा शो गाठला आणि सुरूवाती पासून पूर्ण पाहीला. हेमा मालिनी चा" मीरा ". पण उत्सुकता म्हणून मी काकांना विचारले" मग दुपारच्या शो ला तुमच्या वेळी काय म्हणायचे? "त्यांचे उत्तर होते" अरे तो मॅटीनी शो असायचा ".                                 

काळ कसा बदलत गेला. वडिलांच्या वेळी दुपारी मॅटीनी संध्याकाळी पहिला रात्री दुसरा शो होता. नंतरच्या काळात दुपारी बारा वाजता मॅटीनी तीन वाजता पहिला सहा वाजता दुसरा आणि नऊ वाजता तिसरा शो असे झाले. आज आता एका थिएटर मधे किती चित्रपट असतात आणि किती शो होतात त्याला गणतीच नाही. सकाळी साडे नऊ पासून रात्री साडे अकरा पर्यंत कोणत्याही वेळेला चित्रपट सुरू होतात आणि संपतात. आजच्या काळात ते सोईस्कर आहे. आजची पिढी त्यात रूळली आहे, खूष आहे. एन्जॉय करते.     मॅटीनी या शब्दाचा खरा अर्थ काय असेल तो असो, पण आमच्या लेखी मॅटीनी म्हणजे दुपारी बारा वाजता पाहीलेला सिनेमा - कधी करमणूक प्रधान, कधी संगीत प्रधान, कधी कथा प्रधान तर कधी अभिनय प्रधान सिनेमा! तेव्हाची थिएटर्स, तेव्हाचे मित्र मैत्रिणी, तेव्हाचे दिवस आणि तेव्हाच्या असंख्य आठवणी!          

आता पहा ना, सरदारजी च्या जोक मधला तो एक 'मॅटीनी' शब्द ऐकला काय, जुन्या आठवणींमध्ये मी गुंगून गेलो, स्वतःला हरवून बसलो, नाही का?

ही किमया आहे 'मॅटीनी' ची!          

आता चिंता उद्याच्या मिसळीची

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार