क्षमाशिल कोण? आई की मुलं
*क्षमाशिल कोण???*
🙎*_आई की मुलं_*👫
आईचा वाढदिवस असतो. घरी खूप पाहुणे येणार असतात. त्यांच्या स्वागतासाठी गडबड चालू असते. काचेच्या वस्तूंनी टेबल सजविलेले असते. आईची गडबड पाहून चार-पाच वर्षांचा मुलगा मदत करायचा प्रयत्न करत असतो; पण काम उरकण्याच्या नादात आई मुलाकडे दुर्लक्ष करीत असते. "जा बागेत जाऊन खेळ,'' आई मुलाला सांगते. मुलगा थोड्या वेळाने बागेतून धावत आई..आई करत घरात घुसतो. नेमकी त्याचवेळी आई हातात काचेच्या ग्लासचा ट्रे घेऊन निघालेली असते. मुलगा आईला धडकतो. ट्रे खाली पडून सर्व वस्तू फुटतात. सर्वत्र काचा होतात.
_काम वाढले आणि चांगला सेट फुटला म्हणून आई चिडते. मुलाला खूप बोलते. मुलाला आपली चूक कळते, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. हिरमुसून तो खोलीत जातो._
कामाच्या नादात, पाहुण्यांच्या सरबराईत मुलगा खोलीत जाऊन बसला आहे, तेच आई विसरते.
पाहुणे गेल्यावर स्वतःचे ताट वाढून घेताना तिला मुलाची आठवण येते. माझं बाळ जेवलंच नाही म्हणून ती त्याला शोधू लागते. मुलगा खोलीत झोपलेला असतो. रडून रडून अश्रू गालावर सुकलेले असतात. आईला वाईट वाटते, ती त्याला जवळ घेते. मुलगा झोपेतच हातातील फूल तिच्यापुढे करतो आणि पुटपुटतो "हॅपी बर्थ डे ममा!''
गोष्ट वाचली आणि डोळ्यांतून घळाघळा पाणी व्हायला लागलं.
*मुलं आपल्यावर किती प्रेम करतात आणि आपण त्यांना नेहमीच किती वाईट बोलतो, हे लक्षात येऊन अपराधी वाटायला लागलं. अनेकदा गोष्ट अगदी क्षुल्लक असते; पण आपण त्याचा बाऊ करतो.*
अनेकदा कामे करताना मुले चुका करतात, एखादा निरोप देताना घोळ घालतात; केव्हातरी खोटं बोलतात, त्यांना आवडली म्हणून लोकांची वस्तू उचलून आणतात; अगदी राग आला तर मोठ्यांना उलट मारतातही.
*यामध्ये अंतर्यामी हेतू वाईट नसतो; तर त्या त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया असतात. आपल्याला वाटणाऱ्या त्यांच्या वागण्यातल्या चुका असतात. पण खरे तर ते त्यांचे शिकणे असते.* आपल्याला त्या चुकांपुरतेच बोलायचे असते, पण आपल्याकडून _"वेंधळाच आहेस, आयुष्यात कधी सुधारणार नाहीस, तुझ्यासारखा मूर्ख मुलगा जगात सापडणार नाही; जन्माला आला आहेस तेच मला छळायला,' आदी चुकीची वाक्ये जातात._
इतकी वाईट वाक्ये ऐकूनही थोड्या वेळातच मूल सर्व काही विसरते आणि आपल्याला येऊन बिलगते. गळ्यात हात टाकते- जसे काही घडलेच नाही.
_जर घडलेल्या घटनेवरच शांतपणे आपण मुलाशी बोललो तर पुढे अनेक चुका टळतील. मुले खऱ्या अर्थाने शहाणी होतील._
*खरंच विचार करू या, आपण जे वाईट शब्द मुलांना बोलतो ते आपण आपले मित्र, मैत्रिणी, बहीण-भाऊ, नवरा-बायको यांना वापरले तर आपले संबंध कायमचे संपतील, नाही का?*
_*तात्पर्य :* आपली मुले आपल्यापेक्षा महान आहेत. कारण ती लहान वयातच आपल्याला क्षमा करायला शिकली आहेत._
*ही क्षमाशीलता आपण शिकू या का?
Comments
Post a Comment